Man Captures Cobra Video Viral: साप पाहिला की अनेकांची भंबेरी उडते. त्यात जर सापाने दंश केला तर लवकर उपचार मिळायला हवेत. उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये मात्र एक अजब प्रकार घडला आहे. येथील एका व्यक्तीला विषारी नागाने डसले. त्यानंतर या व्यक्तीने उपचार घेण्याआधी त्याच नागाला पकडून डब्यात भरले आणि मग रुग्णालय गाठले. या व्यक्तीने डब्यातला नाग डॉक्टरांना दाखविला आणि माझ्यावर उपचार करा, अशी विनंती केली. या अतरंगी व्यक्तीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ज्या व्यक्तीला साप चावला त्याचे नाव हरीस्वरुप मिश्रा असल्याचे सांगितले जाते. व्हायरल व्हिडीओमध्ये तो स्वतःचे नाव सांगताना दिसतो. स्वतःचं नाव सांगितल्यानतंर रुग्णालयातील कर्मचारी त्याला पंडीतजी असं संबोधित करतात. मिश्रा लखीमपूर येथील संपूर्ण नगरचे रहिवासी असल्याचे कळते. शुक्रवारी (२३ ऑगस्ट) ही घटना घडली. मिश्रा यांच्या घरी त्यांना नागाने डसले. दंश झाल्यानंतर मिश्रा यांनी स्वतः नागाला पकडून एका प्लास्टिकच्या डब्यात भरले आणि त्याला घेऊन ते रुग्णालयात पोहोचले. “या नागाने मला डसले आहे, लवकर उपचार करा”, असे ते डॉक्टरला सांगतात.
हे वाचा >> Video: एका वर्षाच्या मुलाने खेळणं समजून सापाला चावलं; पुढे झाला अनर्थ, डॉक्टरही हैराण
रुग्णालयात जेव्हा मिश्रा यांनी सर्व प्रसंग सांगितला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. मिश्रा आपला अंगठा दाखविताना दिसतात. त्यावर त्यांनी कापड गुंडाळलेले आहे. एक व्यक्ती बोलतो की, खूप चांगलं काम केलं. तुमचं नाव काय? तेव्हा मिश्रा आपले संपूर्ण नाव सांगतात. यानंतर समोरील व्यक्ती म्हणतो, “अरे पंडीतजी, तुम्ही तर प्रसिद्ध झालात. दुसरा कुणी हे काम करू शकला नसता.”
हे ही वाचा >> हे सर्पमित्र की आधुनिक गारूडी ! आठ बळी गेले, पण वनखाते ढिम्मच; पशुप्रेमी संतप्त
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीच हा व्हिडीओ चित्रीत केल्याचे समोर आले आहे. मिश्रा नागाचा डबा हातात घेऊन सर्व कहाणी सांगत असताना रुग्णालयातील कर्मचारी त्यांना उपचार देण्यासाठी धावपळ करत असल्याचे दिसते. तसेच तुम्हाला लवकरच इंजेक्शन देत आहोत, असे एक व्यक्ती सांगताना ऐकू येते. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या बातमीनुसार हरीस्वरुप मिश्रा आता धोक्याबाहेर असून त्यांची प्रकृती ठीक आहे.