कांदे पोहे आणि चहा, पुरणपोळी आणि दूध किंवा कटाची आमटी यांसारख्या अनेक पदार्थांची सुंदर जोडी असते, जी खवय्ये अगदी आनंदाने खात असतात. काही पदार्थांच्या जोड्या किंवा ज्याला आपण फूड कॉम्बिनेशन म्हणतो ते करण्यामागे काही ठराविक कारणे असतात. मात्र दोन अगदी विरुद्ध प्रकारचे पदार्थ एकत्र करून ‘फ्युजन फूड’ बनवण्याचे एक फॅड सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. असे पदार्थ दर वेळेस विचित्र किंवा वाईटच असतील असे नाही. उदाहरण द्यायचे झाले तर, पेरूवर चक्क लाल तिखट घालून खाल्ले जाते. हे ऐकण्यासाठी काहींना विचित्र वाटू शकते मात्र प्रत्येक्षात हे दोन्हीही पदार्थ एकत्र खाण्यास फार सुंदर लागतात. हे सर्व सांगण्यामागचे कारण म्हणजे, सोशल मीडियावर पुन्हा एकदा एका विचित्र पदार्थाचा व्हायरल होणारा व्हिडीओ.
अंडी आणि पार्लेजी बिस्किटंचा वापर करून ऑमलेट बनवले जात आहे. इतकेच नव्हे तर हा पदार्थ विकलाही जात असल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या माध्यमातून, @foodb_unk नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम, ऑमलेट विकणारा मनुष्य दोन अंडी एका भांड्यात फोडून घेतो. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, मिरच्या आणि मसाले घालून अंडी व्यवस्थित फेटून घेतो. एका तव्यावर बटर तापवून फेटलेल्या अंड्यांचे मिश्रण त्यामध्ये घालतो. यावर तो पार्लेजी बिस्किटाचा पुडा उघडून, जवळपास सर्व बिस्किटं त्या अंड्याच्या शिजत असणाऱ्या मिश्रणावर ठेवतो. शेवटी सगळ्यावर किसलेले चीज घालून ऑमलेट पलटतो आणि ताटामध्ये सॉसबरोबर खाण्यासाठी देतो. असे आपण पाहू शकतो.
हेही वाचा : Viral video : या भेळेचा व्हिडीओ बघूनच होईल तुम्हाला मधुमेह! पाहा शेव-चुरमुऱ्यांपासून नव्हे, तर ‘या’पासून होते तयार
अशी ही भयंकर रेसिपी शेअर झाल्यांनतर, नेटकऱ्यांनी त्यावर अनेक प्रतिक्रिया लिहून, त्यांना हा किळसवाणा प्रकार अजिबात आवडलेला नाही असे म्हंटले आहे. काय आहेत नेमक्या त्यांच्या कमेंट्स पाहा.
“हे असलं काही खाण्यापेक्षा मी उपाशी राहीन” असे एकाने लिहिले आहे. “पार्लेजी बिस्किटांचा अतिशय चुकीचा वापर केला आहे” असे दुसऱ्याने म्हंटले आहे. “यात त्या ऑमलेट बनवणाऱ्या व्यक्तीची काहीच चूक नाही. व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने तिथे जाऊन मोठी चूक केली आहे.” असे तिसऱ्याने म्हंटले आहे. चौथ्याने, “यांना असे घाणेरडे पदार्थ बनवण्याचे कुणी पैसे देतात का?” असे विचारले आहे. तर शेवटी पाचव्याने, “पार्लेजी बिस्किटांनो, आम्ही तुम्हाला वाचवू नाही शकलो, माफ करा.” असे लिहिले आहे.