Man dances in front of police: नुकताच देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि सर्वत्र ‘गणपती बाप्पा मोरया’चा एकच जयघोष सुरू झाला. घरोघरी, गल्लोगल्ली, मोठ-मोठ्या मंडळांमध्ये गणरायाचं आगमन झालं आणि सुखकर्ता दु:खहर्ता म्हणत या सणाला सुरुवात झाली. असं असताना कधी ११ दिवस गेले कळलंच नाही आणि १७ सप्टेंबरला आपल्या लाडक्या बाप्पाला सगळ्या भक्तांनी निरोप दिला.
जसं बाप्पाचं आगमन अगदी थाटामाटात होतं, तशीच त्याची विसर्जन मिरवणूकदेखील अगदी जल्लोषात पार पाडली जाते. ढोल-ताशा, तर बॅंजोच्या गजरात सगळे भाविक आनंदात नाचत गात बाप्पाला निरोप देतात. मनात असंख्य भावना घेऊन बाप्पाला निरोप देणं खूप अवघड होऊन जातं. पण, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत जोशात आपण बाप्पाचा निरोप घेतो.
या विसर्जनाच्या मिरवणुकीत अगदी बेभान होऊन नाचणारे काही जण असतात, ज्यांना खरंच कशाचंच भान नसतं. पण, काही जण उगाच खोड म्हणून किंवा मजा मस्ती म्हणून समोरच्याला त्रास देत डान्स करत असतात. सध्या अशाच एका माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो मुद्दाम पोलिसांसमोर डान्स करताना दिसतोय.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस चक्क पोलिसांसमोर डान्स करताना दिसतो आहे. विसर्जनाच्या मिरवणुकीत बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांच्या समोर हा माणूस डान्स करत आहे. आजूबाजूला अनेक माणसंही जमा झालेली दिसत आहेत. परंतु, या माणसाला डान्स करताना पाहून पोलिस कोणतीच प्रतिक्रिया देत नाहीत किंवा त्याच्यावर कठोर कारवाई करत नाहीत.
हा व्हिडीओ @lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला एक लाखापेक्षा जास्त व्हयूज आले आहेत. तसंच “मिरवणूक अशा नमुन्यांशिवाय पूर्ण होत नाही”, असं कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “जरी या लहान-सहान गोष्टींंना महाराष्ट्र पोलिस सोडून देत असले तरी जेव्हा ते कारवाई करतात ना, तेव्हा काय काय आठवतं ते त्यांनाच माहीत आहे; जय महाराष्ट्र पोलिस” तर दुसऱ्याने “प्रत्येक गावात एक तरी नमुना असतोच”, अशी कमेंट केली. तर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.