तुर्कीतील एका ऐतिहासिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा एक विचित्र अपघातात वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाला. एका डोंगरकड्यावर फोटो काढण्यासाठी पोज देत असताना हा अपघात झाला. डोंगराच्या कड्याजवळ असणाऱ्या एका दगडावरून उभं राहून हवेत उडी मारत फोटो काढण्यासाठी ही व्यक्ती पोज देत होती. फोटोसाठी उडी मारल्यानंतर या व्यक्तीचा तोल गेल्याने तो दिडशे फूट खोल दरीत कोसळला. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाला आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण तुर्कीमधील उर्फा कॅसल या ऐतिहासिक ठिकाणी हा विचित्र अपघात घडला. हलील डग हा आपल्या मित्रांबरोबर स्वत:चा ३९वा वाढदिवस साजरा करण्यासाठी येथे आला होता. त्यावेळी फोटो काढताना तो १५० फूट दरीमध्ये पडला. अपघातानंतर त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या अपघाताचा व्हिडीओ युट्यूबवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हलील डोंगरकड्याजवळ फोटोसाठी पोज देताना एका दगडावरून उडी मारताना दिसतो. मात्र उडी मारल्यानंतर त्याचा तोल जातो आणि तो दरीमध्ये कोसळतो. त्याचा तोल जाताना त्याचे मित्र त्याला सावरण्यासाठी पुढे सरसावतात तोपर्यंत तो दरीत पडत असल्याचेही या व्हिडीओत दिसते.
या घटनेबद्दल स्थानिक प्रशासनातील अधिकारी किंवा पोलिसांनी कोणतेही माहिती दिली नसून यासंबंधात आपले मतही नोंदवलेले नाही. स्थानिकांच्या मते या कड्यावर सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असणारे कूंपण असते तर हलीलचा जीव वाचला असता.
पाहा या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ