आपण सगळेच एका भयानक रॅटरेसमध्ये आहोत असं बऱ्याचदा वाटतं. खाण्यापिण्याची शुध्द नाही, झोपेचा पत्ता नाही, रिचार्ज आणि डिस्चार्ज या दोनच ‘मोड’ वर चालणारं आपलं रोजचं जीवन अंगावर येतं.
आपण सगळे धावायला तयार म्हणून आपल्याला धावायला लावणारेही तयार. जरा गोष्टी व्यवस्थित करू असं ठरवत सूट मागितली तर नकारघंटा नेहमीचीच. पण काहीही झालं तरी आपल्या मुलाच्या जन्माच्या वेळी अख्ख्या जगाची तामझाम बाजूला फेकत त्या फार मोठ्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक बाप धडपडत असतो.
पण अमेरिकेत बायकोच्या प्रसूतीच्या दिवशी सुट्टी घेतली म्हणून एकाला बाबाला चक्क नोकरीवरून काढण्यात आलं.
अमेरिकेत न्यू हँपशर राज्यात राहणाऱ्या लामार आॅस्टिनची पत्नी गरोदर होती. अमेरिकन सैन्यात सैनिक म्हणून निवृत्त झालेला आॅस्टिन एका खाजगी सुरक्षा कंपनीत काम करत होता. २९ डिसेंबरला आॅस्टिनच्या पत्नीला कळा यायला लागल्याने त्याने तिला हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यादिवशी त्याची सुट्टी मंजूर झाली खरी. पण दुसऱ्या दिवशी त्याच्या पत्नीला प्रसूतीकळा कायम राहिल्याने त्याने आपल्या बाॅसला परिस्थितीची कल्पना देत आणखी दोन दिवसांची सुट्टी मागितली. जगातल्या आपल्या बाळाच्या पहिल्या क्षणांचा साक्षीदार त्याला व्हायचं होतं. त्याच्या या साध्या इच्छेचा मान न राखता त्याच्या बाॅसने त्याला कामावर यायला फर्मावलं. त्याने नकार दिला. या नाजूक क्षणी त्याला आपल्या पत्नीची साथ सोडायची नव्हती.
१ जानेवारी २०१७ ची रात्र…… जगभर नवीन वर्षाचा जल्लोष सुरू होता आणि आॅस्टिन हाॅस्पिटलमध्ये एकटाच बसला होता. रात्री १ वाजता त्याला एसएमएस आला की त्याला कामावरून काढण्यात आलंय.
”मी शांतपणे ‘ओके’ असं उत्तर पाठवलं” आॅस्टिनने स्थानिक मीडियाला सांगितलं “माझ्या बाळाच्या जन्माच्या दिवशी मला नोकरीसाठी कोणाशी भांडण करायचं नव्हतं”
यानंतर काही तासांनीच त्यांच्या पत्नीने त्याच्या मुलाला जन्म दिला. त्या क्षणी आॅस्टिन आपल्या पत्नीसोबतच होता.
आॅस्टिनची ही गोष्ट प्रसिध्द होताच अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातून संतापाच्या प्रतिक्रिया आल्या. आपल्या बाळाच्या जन्माच्या वेळी पत्नीला साथ देऊ पाहणाऱ्या आॅस्टिनला एवढी वाईट वागणूक दिल्याने त्या सुरक्षा कंपनीवर प्रचंड टीका झाली.
आश्चर्याची बाब म्हणजे त्या कंपनीने फार उध्दट भूमिका घेतली. पहिल्यांदा आम्ही त्याला सुट्टी नाकारलीच नाही असा कांगावा करणाऱ्या कंपनीने प्रकरण अंगाशी येतंय म्हटल्यावर आॅस्टिनचं मुलाच्या जन्मासाठी अभिनंदन केल्यासारखं केलं आणि त्याला परत नोकरीची आॅफर दिली. पण परत नोकरीवर येताना त्याने आपली ‘वर्तणूक सुधारावी’ आणि ‘नव्या ट्रेनिंगसाठी तयार रहावं’ अशी बेमुर्वतखोर भूमिका घेतली.
आॅस्टिनने अर्थातच नोकरी नाकारली.
आपल्या बायकोसोबत मुलाची काळजी घेण्यात गुंतलेल्या आॅस्टिनला अमेरिकेत सगळीकडून आधार मिळाला. अनेक जणांनी त्याच्याशी संपर्क करून ते त्याच्यासोबत असल्याचा धीर दिला. नोकरी गेल्यानंतरचे काही दिवस खडतर होते. पण आॅस्टिनच्या म्हणण्यानुसार नोकरी पुन्हा न स्वीकारण्याच्या त्याच्या निर्णयाच्या परिणामांना सामोरं जायला तो तयार होता.
सुदैवाने त्याची गोष्ट एेकलेल्या एका दुसऱ्या कंपनीतल्या अधिकाऱ्याने आॅस्टिनला नोकरी दिली आणि त्याच्या कुटुंबाचं आयुष्य रूळावर आलं.
हा सगळा त्रास त्याला टाळताही आला असता. काय मोठं होतं? गेला असता तो कामावर त्या दिवशी. पण आपल्या चिमुकल्यासाठी त्याने हे वादळ झेललं आणि आपल्या बायकोला समर्थपणे साथ दिली.
आपल्या नोकरीधंद्यासाठी सगळं विसरत खपत राहणं, जीवतोड मेहनत घेणं , थकणं, चिडचिडं होणं हे सगळं चक्र सुरूच असतं. दु:खात राहण्याची इतकी सवय होते की तेच आपलं जग बनून जातं. पण आनंदी राहणं हा सुध्दा आपल्याकडे असलेला एक चाॅईस आहे,नाही का? जssरा डोकं वर करून बघितलं की आपल्याभोवती, आपल्यासाठी खरोखर आनंदी होणारे मायेचे चेहरे दिसायला लागतात. आणि सरतेशेवटी ‘कशासाठी….कशासाठी’ चं मनाला भावणारं उत्तर गवसत जातं