Shocking Video Viral : रील्सच्या वेडापायी हल्ली लोक काय करतील काही सांगता येत नाही. काही जण जीव धोक्यात घालून रील्स बनवताना दिसतात, तर काही जण अश्लील डान्स रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. रील्सच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील याचा कोणी विचारही करू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका तरुणाने रीलसाठी विकृतीच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसतेय. ही घटना पंजाबमधील जालंधरमध्ये घडली आहे.

व्हिडीओत तरुणाने रीलसाठी एका जिवंत मांजरीचा जीव घेतला आहे. तरुणाने एका पिसाळलेल्या श्वानाला मांजरीवर हल्ला करण्यासाठी सोडलं. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी मांजरीचे पाय बांधून ठेवले होते, ज्यामुळे ती जीव वाचवण्यासाठी कोणतीही हालचाल करू शकत नव्हती. याहून संतापजनक गोष्ट म्हणजे श्वान मांजरीवर हल्ला करत असताना हा नराधम तरुण त्यांचा व्हिडीओ शूट करत होता. या विकृत घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पंजाब पोलिसांनी तरुणास अटक केली आहे.

मनदीप असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. इन्स्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मांजराच्या पिल्लाला बांधून श्वानाच्या समोर ठेवलं आहे. यावेळी पिसाळलेला श्वान मांजरीवर हल्ला करतो. पण, बांधल्यामुळे मांजर काही करू शकत नाही, त्यामुळे श्वान मांजरीचे लचके तोडण्याचा प्रयत्न करतो.

मनदीपच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्राण्यांवर अत्याचार करणारे अनेक व्हिडीओ पोस्ट पाहायला मिळतात. एका व्हिडीओत तो एका पाळीव श्वानाला ओढत नेताना दिसतोय. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्वानाला तो अमानुषपणे ओढताना दिसतोय. दरम्यान, अनेकांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत या प्राण्याला योग्य न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान, अनेक प्राणिप्रेमी संघटनांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

Story img Loader