मिशा वाढवणे आणि त्याच्या वेगवेगळ्या स्टाईल करणे ही मुले आणि पुरुषांसाठी अनेकदा महत्त्वाची गोष्ट असते. पूर्वी रुबाब म्हणून ठेवली जाणारी ही मिशी आता स्टाईल स्टेटमंट झाली आहे. आता ही मिशी कधीच कापली नाही तर ती किती वाढेल याची आपण कल्पनाही करु शकणार नाही. पण एका व्यक्तीने एक दोन नाही तर तब्बल ३३ वर्ष आपली मिशी वाढवली आहे. राजस्थानच्या बिकानेरमध्ये राहणारे गिरधर व्यास यांनी ही करामत केली आहे. आता ते ५८ वर्षांचे असून त्यांनी मागील ३३ वर्षांपासून मिशी एकदाही कापलेली नाही.
आता ३३ वर्ष मिशा कापल्या नाहीत त्यामुळे त्या २८ फूट लांब वाढल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या मिशा नीट करण्यासाठी रोज त्यांनी ३ तासांचा वेळ लागतो. आपल्या या मिशांना त्यांनी एकदाही साबण आणि शाम्पू लावला नसल्याचे ते सांगतात. रोज सकाळी उठल्यावर मी मिशा नीट करायला बसतो आणि त्यासाठी माझा बराच वेळ जातो असेही त्यांनी सांगितले. मिशा धुण्यासाठी ते मुलतानी माती वापरतात. तसेच त्याचे केस मुलायम राहण्यासाठी ते त्यांना लिंबू आणि मिरपूड यांचा लेप लावतात. याबरोबरच आपण मिशांना तेलाने मालिश करतो असेही त्यांनी सांगितले.
आता या मिशा त्यांनी केवळ आवड म्हणून वाढविल्या असल्याने ते आवडीने त्याची काळजी घेतात. मात्र ही काळजी घेणे हे अवघड आणि अतिशय संयमाचे काम असल्याचे ते म्हणतात. पण या मिशांमुळे मला खुप प्रसिद्धी मिळत असून लोक मला सेलिब्रिटीप्रमाणे वागणूक देतात असेही व्यास सांगतात. त्यांच्या या मिशांची सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा होते हेही तितकेच खरे.