Sneezing & Coughing At A Time Cause Intestine Thrown out: शिंकणे व खोकणे या दोन्ही गोष्टी एकत्र करताना एका ६३ वर्षीय व्यक्तीच्या बाबत अत्यंत विचित्र व धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे. ही व्यक्ती मूळ फ्लोरिडा येथील रहिवाशी आहे. अलीकडेच आपल्या पत्नीसह एका रेस्टॉरंटमध्ये नाष्टा करण्यासाठी म्हणून गेल्यावर या व्यक्तीला एकाच वेळी व शिंक व खोकला आल्याने त्याच्या शरीरातून त्याचे आतडे बाहेर पडल्याचे समजतेय. द न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, प्रोस्टेट कर्करोगाशी लढा दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याचे आतडे शरीरातून बाहेर येण्याच्या काही तास आधी, त्याच्या पोटातून शिवण काढण्यात आली होती.

हे धक्कादायक प्रकरण अमेरिकन जर्नल ऑफ मेडिकल केस रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले असून या प्रकरणाच्या तपशीलावर प्रकाश टाकण्यात आला आहे. “नाष्टा करत असताना, या व्यक्तीला आधी शिंका येत होत्या आणि अचानक त्याला जोरजोरात खोकला यायला लागला. शिंका व खोकला याच्या एकत्रित ताणामुळे त्याच्या ओटीपोटात वेदना होऊ लागल्या. यानंतर त्याने त्याच्या शस्त्रक्रिया झालेल्या भागाकडे पाहिले असता तिथून गुलाबी आतड्याचे अनेक भाग बाहेर पडलेले दिसले.”

शरीरातून आतडे बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीने अंग शर्टाने झाकले व त्याच्या पत्नीने रुग्णवाहिका बोलावली. जेव्हा पॅरामेडिक्स टीम आली तेव्हा त्यांना “मोठ्या प्रमाणात आतड्यांसह अंदाजे 3-इंच उभ्या जखमा” बाहेर पडताना दिसल्या. सुदैवाने, त्या माणसाचे जास्त रक्त वाया गेले नव्हते आणि त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले.

आपत्कालीन विभागात, युरॉलॉजिस्टचा सल्ला घेतल्यावर, ऑपरेशनच्या आधी काही रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या. यानंतर एक नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब रुग्णाच्या शरीरात घालण्यात आली. शल्यचिकित्सकांनी काळजीपूर्वक आतडी उचलून उदरपोकळीच्या आत टाकली आणि लहान आतडीच्या संपूर्ण लांबीची तपासणी केली. त्यांना दुखापतीचा कोणताही पुरावा आढळला नाही. शल्यचिकित्सकांनी ओटीपोटाला आठ टाक्यांनी शिवले. ६३ वर्षीय वृद्ध सहा दिवस रुग्णालयात होते आणि डिस्चार्जपूर्वी त्यांनी सामान्य आहार घेतला.

हे ही वाचा<<खूप हसल्यामुळे हैदराबादमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध; पण हे कसे शक्य? तज्ज्ञांनी केला खुलासा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशीच एक विचित्र घटना हैदराबादमध्ये घडल्याचे समोर आले होते. ‘चहा आणि कॉमेडी शो’चा आनंद लुटताना ‘श्याम’ (नाव बदलले आहे) यांना खूप हसू येत होते. हसताना अचानक त्यांच्या शरीराचे संतुलन बिघडले त्यांचे शरीर अचानक शक्तिहीन झाले आणि ते बेशुद्ध होऊन खुर्चीवरून खाली कोसळले. सुदैवाने, त्यांना त्वरित वैद्यकीय मदत मिळाली. डॉ. कुमार यांनी त्यांच्या स्थितीचे निदान हास्य-प्रेरित सिंकोप (laughter-induced syncope) म्हणून करण्यात आले. ही एक दुर्मीळ. परंतु वास्तविक घटना आहे.