आपले आरोग्य उत्तम राहावे, शरीराला हालचाल हवी म्हणून आपण चालणे, धावणे, सायकल चालवणे किंवा काही मिनिटांसाठी दोरीच्या उड्या मारण्याचा सराव करत असतो. १००, २०० फार तर फार ३०० दोरीच्या उड्या सराईत व्यक्ती न थकता मारू शकतो. लहानपणी शाळेची सुट्टी असताना किंवा मधल्या सुट्टीत वगैरे मैदानात जाऊन सर्व मित्र-मैत्रिणी मिळून दोरीच्या उड्या हा खेळ खेळायचो. त्यामध्ये दोन्ही पायांवर, एका पायावर लंगडी घालत किंवा घोडागाडीप्रमाणे म्हणजे आळीपाळीने पाय बदलत त्या दोरीच्या मध्ये उड्या मारायचो. मात्र, या एवढ्या साध्या खेळातही कितीतरी वेगवेगळे आणि आश्चर्य वाटणारे प्रकार असतात, हे इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर झोरावर सिंग यांनी आपल्या @zorawarsingh९९ या अकाउंटवरून अनेक व्हिडीओ शेअर करून दाखवून दिले आहे.
झोरावर सिंग हे एक आंतरराष्ट्रीय जंप रोप ॲथलिट असून, त्यांच्या नावावर चक्क ‘१७ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची’ नोंद आहे. सध्या झोरावर यांच्या एका व्हिडीओची चर्चा सोशल मिडियावर तुफान होत आहे. त्याला कारणसुद्धा तसेच आहे. या व्हिडीओमध्ये झोरावर जमिनीवर आपल्या पाठीवर झोपलेले आहेत. त्यांच्या पोटावर/कंबरेवर एक मुलगी उभी राहिली असून तिच्या खांद्यावर अजून एक लहान मुलगा बसला आहे. पोटावर उभ्या राहिलेल्या मुलीच्या हातामध्ये दोरीच्या उड्यांची दोरी होती. सगळे व्यवस्थित स्थिर झाल्यानंतर, मुलीने दोन्ही हाताने दोरी फिरवली आणि झोरावर त्या दोघांसहित आपल्या पाठीवर उड्या मारू लागला. त्याने किमान तीन ते चार उड्या या पद्धतीने मारण्याचा पराक्रम केला आहे, असे या व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
हेही वाचा : Viral video : ही जगावेगळी ‘शिट्टी’ ऐकून तुम्हीही व्हाल थक्क! गिनीज बुकात नोंद झालेल्या ‘लुलु लोटस’चा ‘हा’ व्हिडीओ पाहा
गिनीज बुकच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरूनदेखील काही वर्षांपूर्वी झोरावरचा व्हिडीओ शेअर झालेला आहे. त्यावरून ३० सेकंदांमध्ये स्केटिंग [चाकं लावलेले बूट] बूट घालून १३५ दोरीच्या उड्या मारून झोरावरने जागतिक विक्रम बनवला असल्याचे समजते.
सोशल मीडियावर झोरावरने आपला पाठीवर दोरीच्या उड्या मारतानाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत, पाहा.
“भारताची शान आहे ही व्यक्ती” असे एकाने लिहिले आहे. “कमाल, खूप भारी सर” असे दुसऱ्याने लिहिले आहे. तिसऱ्याने, “कृपया कुणीही हे धाडस घरी किंवा बाहेर करू नये” असा सल्ला सर्वांसाठी दिला आहे. चौथ्याने, “जबरदस्त कला आहे ही” असे म्हटले आहे. तर शेवटी पाचव्याने, “असे काही जमू शकते हे तुम्हाला कधी समजले?”, असा प्रश्न केला आहे.
झोरावर सिंगने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत ६.७ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.