रस्त्यावर गाड्यांची भलीमोठी रांग लागली असताना रस्ता अडवला गेला की विनोदाने आपसूक आपल्या तोंडून एक वाक्य निघतं, “आता काय उड्या मारत जाऊ?”. कल्पना करा की, खरंच अश्या उड्या मारत गाड्यांची भलीमोठी रांग पार करता आली तर? तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? पण हे शक्य करून दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तरूणाने एक दोन नव्हे तर तब्बल पाच गाड्यांमधलं अंतर पार करत उड्या मारून नवा विश्वविक्रम रचलाय. याची नोंद नुकतीच गिनीस बुक ऑफ वर्ल्डमध्ये करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरूण हातात पकडलेल्या पोगो स्टिकच्या मदतीने सुरूवातीला पहिली गाडी पार करत उडी मारण्यात यशस्वी होतो. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या गाडीवरून उडी मारत पुढची गाडी सुद्धा पार करतो. यापुढे त्याच जोशमध्ये तो बघता बघता पुढे तिसरी आणि चौथी गाडी सुद्धा पार करतो. त्यानंतर जेव्हा शेवटी पाचव्या कारवरून उडी मारण्याची वेळ येते त्यावेळी त्याने स्वतः झोकून देत कोलांडी उडी घेत पाचवी गाडी सुद्धा त्याच जोशमध्ये पार करतो. एकूण पाच गाड्या त्याने पोगो स्टिकने उड्या मारत पार केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतोय.
पोगो किंवा पोगो स्टिक हे लहान उंची किंवा अंतरावर उडी मारण्यासाठी वापरण्यात येणारं खेळण्याचं एक साधन आहे. यात वरच्या बाजूला हँडल असलेला लांब, स्प्रिंग-लोड केलेला खांब असतो आणि तळाशी येत असलेल्या व्यक्तीच्या पायांना विश्रांती देतो. बहुतेक मुलं ही पोगो स्टिक खेळण्यासाठी खरेदी करत असले तरी अनेक स्टंट करणारे व्यक्ती त्यांच्या अॅक्रोबॅटिक चाल आणि रेकॉर्डसाठी ही स्टिक वापरत असतात. ही पोगो स्टिक नेहमीच्या काडीपेक्षा मोठी आणि मजबूत असते. याच पोगो स्टिकच्या मदतीने तरूणाने हा विश्वविक्रम आपल्या नावे केलाय.
टायलर फिलिप्स असं या तरूणाचं नाव असून तो एक्स्ट्रीम पोगो जम्पर आहे. टायलर फिलिप्स हा २१ वर्षाचा तरूण आहे. स्ट्रॅटफोर्डमधील प्रतिष्ठित ऑलिम्पिक पार्कच्या शेजारीच पाच गाड्या उभ्या होत्या. हे पाहून फिलिप्सने हा अनोखा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी देखील झाला. ‘मोस्ट कॉन्सक्यूटिव्ह कार्स जम्प्ड ओव्हर ऑन अ पोगो स्टिक’ हा नवा विक्रम त्याने आपल्या नावे केलाय. फिलिपने ज्या गाड्यांवर उडी मारली ती जवळपास २ मीटर उंच आणि १.६ मीटर रुंद इतक्या अंतरावर होती.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : विमानतळावरच महिलांची ‘दारू पार्टी’, इतर प्रवाशांना सुद्धा वाटली दारू
टायलर फिलिप्स त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल बोलताना म्हणाला, “व्वा, मला अजुनही विश्वास होत नाही की मी हा विक्रम मोडू शकलो. मला हे खूप दिवसांपासून करायचं होतं आणि आज सकाळी योगायोगाने पाच गाड्या रांगेत उभ्या होत्या हे पाहून मला हा प्रयत्न करण्याची इच्छा झाली.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच आवडलाय. हा व्हिडीओ शेअर करून अजुन २४ तास देखील उलटले नाही तर या व्हिडीओला आतापर्यंत ३२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. नेटिझन्स सुद्धा या तरूणाच्या अनोख्या विश्वविक्रमाने खूपच प्रभावित झाले आहेत. इतकंच नव्हे तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या मुख्य संपादकावरही या तरूणाने वेगळी छाप सोडली आहे.