करायला जातो एक आणि होतं काहीतरी वेगळंच. ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. पण एखादी छोटीशी चूक किती महागात पडू शकते याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. कॅलिफोर्नियामध्ये राहणारा एक व्यक्ती त्याच्या आई-वडिलांचे घर सांभाळत होता. या घराबाहेर मोठ्या प्रणाणात कोळी झाले होते. त्या कोळ्यांना मारण्यासाठी त्याने एका यंत्राचा उपयोग केला. मात्र हे करताना पुरेसा अंदाज न आल्याने लाकडी घराला आग लागली आणि संपूर्ण घर जळाले. नशीबाने यावेळी घरात कोणीच नसल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ वर्षाच्या एका मुलाने अग्निशमन दलाला फोन केला. त्यावेळी या घरातून धुराचे लोट येत असल्याचे वृत्त आहे.
घरातील पोटमाळ्यावर बरेच कोळी असल्याने हे कुटुंबिय काहीसे त्रासले होते. यावर कोणता उपाय करायचा हे त्यांना समजत नव्हते. त्यावेळी या तरुणाने कोळ्यांना मारण्यासाठी ब्लोटॉर्चचा वापर केला. मात्र त्यामुळे संपूर्ण घरानेच काही वेळात पेट घेतला. या ज्वाला घराच्या पोटमाळ्यापर्यंत पोहोचल्या आणि काही क्षणात घरातून आगीचे लोट बाहेर यायला लागले. अमेरिकेसारख्या देशात लाकडाची घरे असतात. लाकूड लवकर पेट घेत असल्याने या संपूर्ण घराने पेट घेतला. सुदैवाने घरात कोणीही नव्हते त्यामुळे जीवितहानी झाली नाही, अन्यथा ही घटना निश्चितच जीवावर बेतणारी ठरली असती. या घटनेनंतर घरातील अनेक गोष्टींची हानी झाल्याचे समोर आले आहे. मात्र अशाप्रकारे कीडे मारणे हे चुकीचे असल्याचे अग्निशमन दलातील कर्मचाऱ्याने सांगितले.