Viral Video: आपल्यातील बऱ्याच जणांची दिवसाची सुरुवात ही गरमागरम चहा पिऊन होते. देशात चहाचे वेगवेगळे प्रकार आढळून येतात. त्यामध्ये मसाला चहा, कुल्हड चहा, तंदुरी चहा आदी प्रकार सध्या ट्रेंडमध्ये दिसतात. तसेच सोशल मीडियावरही विचित्र पद्धतीने चहा बनविण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात; जे अनेकांना थक्क करून सोडतात. आज असाच एक प्रयोग एका युजरने केला आहे. त्याने चक्क मातीच्या पणत्यांचा वापर करून, अनोखा असा चहा बनवला आहे. मातीच्या दिव्यांपासून तयार केलेली ही अनोखी चहा एकदा बघाच.
या व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, गरम पाण्याच्या एका भांड्यात चार मातीचे दिवे ठेवले आहेत. त्यानंतर त्यात सॉफ (एका प्रकारची बडीशेप), साखर व गूळ घातला जातो. लवंग, वेलची व अर्धा चमचा चहा पावडर, दूध घालून चहा उकळवला जात आहे. तसेच या अनोख्या चहाची कृती सांगताना व्हिडीओत एक व्यक्ती व्हॉइसओव्हर (Voice Over)सुद्धा देत आहे.
हेही वाचा…VIDEO: पर्यावरणाचे संरक्षण! टाकाऊ बसचे साकारले कॅन्टीन; काय असणार सुविधा? एकदा पाहाच
व्हिडीओ नक्की बघा :
या व्हिडीओत गरम पाण्यात मातीच्या पणत्या ठेवून, बडीशेप, लवंग, वेलची, दूध घालून चहा उकळवला आहे. त्यानंतर तो माणूस मातीचे दिवे चहामधून बाहेर काढतो आणि गाळणीद्वारे चहा गाळून असा अनोखा दिव्यांचा चहा तयार करतो. तंदूर चहा बनविताना तंदूरमध्ये मातीचे कप ठेवून, ते गरम करण्यात येतात. अगदी त्याचप्रमाणे युजरने हा अनोखा प्रयोग केला आहे. तसेच व्हिडीओच्या व्हॉइसओव्हरमध्ये, चहाची ही रेसिपी मुंबईच्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बनविताना बघितली आहे आणि मातीचे दिवे ठेवल्यामुळे या चहाला स्वाद येईल, असे हॉटेलच्या कर्मचाऱ्याने सांगितल्याचे युजरचे म्हणणे आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @taste.thee.best या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक चहाप्रेमींंनी हा व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया; तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने कमेंट केली, “उद्या यामध्ये एक वीटसुद्धा टाका.” “तुम्हाला हॉटेलच्या किचनमध्ये जाण्याची परवानगी कोणी दिली?, “याच्यापेक्षा मातीच्या भांड्यात चहा टाकून उकळवली असती, तर बरं झालं असतं” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत