इंडोनेशियामधील एका तरुणाने एकाच वेळी आपल्या दोन प्रेयसींबरोबर लग्न केले आहे. दोघींपैकी कोणालाही दु:ख होऊ नये म्हणून या तरुणाने दोघींशी एकाच वेळी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे ‘व्हाइस इंडोनेशिया’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. या लग्नाचा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणाच्या दोन्ही बाजूला त्याच्या प्रेयसी बसलेल्या दिसत आहेत.

कालीमंता येथील अरितारप येथे हा आगळावेगळा विवाहसोहळा १७ ऑगस्ट रोजी पार पडला. दोघींशी एकाच वेळी लग्न करण्यासाठी या मुलाने मुलीच्या घरच्यांना हुंड्याची मोठी रक्कम दिल्याचे व्हाइस मिडियाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. इंडोनेशियामध्ये नवरा मुलगा नवरीच्या घरच्यांना हुंडा देणे ही समान्य प्रथा आहे. मुलगा मुलीची योग्य काळजी घेईल हे दाखवण्यासाठी हुंडा देण्याची पद्धत इंडोनेशियामध्ये पूर्वापार चालत आली आहे.

या तिघांच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये लग्नाच्या वेळीची वचने बोलताना हा तरुण अडखळताना दिसत आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही तरुणी एकमेकींना ओळखतात. त्या दोघींनाही एकमेकींशी कोणतीही अचडण नसून त्यांच्या संमतीनेच हे लग्न एकाच वेळी करण्यात आले आहे. या दोघीही मला प्रिय असून त्यांच्यापैकी कोणालाच मी दुखवू शकत नव्हतो म्हणून मी एकाच वेळी दोघींशी लग्न करण्याचा निर्णय घेताल असं या मुलाने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलातना सांगितले आहे.

एकापेक्षा अधिक महिलांशी लग्न करणे इंडोनेशियामध्ये कायद्याने गुन्हा ठरवण्यात येत नाही. कायद्यानुसार एका पुरुषाला चार महिलांशी लग्न करण्याची परवानगी आहे. मात्र या सर्व महिलांचा संभाळ करण्याची जबाबदारी या पुरुषालाच घ्यावी लागते.

Story img Loader