उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे एक महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिला पहाटे दूध आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली होती. त्यावेळी एक पुरुष तिचा पाठलाग करीत होता. काही वेळात तो त्या महिलेच्या जवळ पोहोचला आणि तिचे तोंड दाबून गैरवर्तन करू लागला. यावेळी महिलेने विरोध करीत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त करीत आरोपीला अटक करून, कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

महिलेचा विनयभंग; व्हिडीओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, अमरोहा येथील चौपला पोलीस चौकी परिसरातील सैफी नगरमध्ये ही घटना घडली. त्यातील पीडित महिला नेहमीप्रमाणे पहाटे दूध आणण्यासाठी म्हणून घरातून निघाली. यावेळी कुर्ता-पायजमा घातलेली एक व्यक्ती त्या महिलेचा पाठलाग करू लागली. काही वेळातच ती व्यक्ती त्या महिलेच्या अगदी जवळ पोहोचली आणि नंतर तिचे तोंड दाबून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने विरोध करीत मदतीसाठी जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे आरोपीने घाबरून पळ काढला. घटनेच्या वेळी काही अंतरावर उभा असलेला एक ई-रिक्षाचालक घटनास्थळी आला. पण, त्याने आरोपीला पकडण्याऐवजी त्याचा केवळ पाठलाग केला. आरोपीला पळून जाण्यास रिक्षाचालकाने मदत केल्याचे सांगण्यात येत आहे.

पाहा व्हिडिओ

आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी त्यांच्या घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता , आरोपी अनेक दिवसांपासून या परिसरात रेकी करीत असल्याचे आढळून आले. सीसीटीव्ही व्हिडीओच्या आधारे पोलिसांत तक्रार करण्यात आली.

पीडित महिलेने घरी परतल्यावर कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक करीत कारवाई केली आहे. आरोपीचा एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये पोलीस त्याच्या खांद्यांवर दोन हात टाकून, त्याला घेऊन जाताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अताउर रहमान असे आरोपीचे नाव असून, पोलिसांकडून त्याच्याविरोधात कारवाई सुरू आहे.