आपले आयुष्य हे सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाने फारच सोईचे केले आहे. त्यामुळेच आपण घर बसल्या, डिलिव्हरी अॅप्सवरून आपल्याला हव्या असणाऱ्या कोणत्याही वस्तू अगदी सहज मागवीत असतो. परंतु, जिथे सोई आहेत तिथे कधी कधी गैरसोईचाही अनुभव येत असतो. अशा डिलिव्हरी अॅपवरून मागवलेले पदार्थ वा वस्तू कधी कधी चांगल्या दर्जाच्या नसतात किंवा चुकीच्या तरी पाठवल्या जातात. याच संदर्भात सध्या एक्स [ट्विटर] या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कारण- या पोस्टनुसार एका व्यक्तीने स्विगी या डिलिव्हरी अॅपचा वापर करून घरसामान मागवले; परंतु ते सामान त्याला चक्क सहा पट मिळाले असल्याचे समजते.
@pranayloya या हॅण्डलरने हातात सामान घेऊन उभ्या असणाऱ्या सामान पोहोचवणाऱ्या तीन व्यक्तींचा (डिलिव्हरी बॉइज) फोटो शेअर करून, नेमके काय घडले आहे ते सांगितले. त्यानुसार पोस्ट शेअर करणाऱ्या या व्यक्तीने एक किलो इडलीचे पीठ, एक अननस, दुधाची दोन खोकी आणि काही च्युइंगम मागवल्याचा फोटो टाकला आहे. त्यासोबत, “मी चुकून स्विगीचे डिलिव्हरी अॅप खराब केले आहे वाटतं..! ‘स्विगी’चे सहा कर्मचारी माझ्या घरी सारखीच ऑर्डर घेऊन आले आहेत. काय झालंय ते खाली दिले आहे” अशी कॅप्शनसुद्धा सोबत लिहिण्यात आली आहे.
हेही वाचा : India ‘Swiggy’d’ in 2023 : २०२३ वर्ल्ड कप फायनलचा दिवस ठरला ‘नॅशनल फूड डे?’ १४ मे, १ जानेवारीला Swiggy च्या ऑर्डर्स पाहून व्हाल चकित…
“ऑर्डर देतानाच मला पैसे भरल्याचा मेसेज आला; पण अॅपवर ऑर्डर रद्द झाल्याचे दिसत होते. त्यामुळे मी पुन्हा एकदा तीच ऑर्डर दिली आणि परत तसेच झाले. हे असे बराच वेळ चालू होते.” असे प्रणय लॉयने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “मी पुन्हा एकदा त्याच वस्तू नव्याने अॅड करून COD (कॅश ऑन डिलिव्हरी)चा पर्याय या आशेने निवडला, की किमान आता तरी मला माझी ऑर्डर मिळेल. परंतु, पुन्हा पुन्हा तोच प्रकार घडत राहिल्याने, मी शेवटी ते अॅप बंद करून, दुसरे डिलिव्हरी अॅप वापरून मला हव्या असणाऱ्या वस्तू मागवल्या,” असेदेखील प्रणय याने सांगितले आहे.
“त्यानंतर काही वेळाने माझा फोन सतत वाजू लागला आणि बघता बघता सहा सामान पोहोचवणाऱ्या व्यक्ती एकसारखीच ऑर्डर घेऊन आल्या होता. यादरम्यान कस्टमर सपोर्टने माझा कोणताही फोन उचलला नाही किंवा माझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तरसुद्धा दिले नाही. आता माझ्याकडे सहा किलो इडली पीठ, २० लिटर दूध व सहा अननसाची खोकी आली आहेत. या सगळ्याचं मी काय करू?”
या पोस्टची दखल ‘स्विगी’च्या अधिकृत अकाउंटने घेतली असून, प्रणय लॉयला त्याचा ऑर्डर आयडी पाठवण्यासाठी सांगितले आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होताच त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या असून, अनेकांना त्याने त्याच्याकडे आलेले जास्तीचे सामान गरिबांमध्ये वाटावे, असे वाटते. तर काही जण, ती व्यक्ती लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे म्हणत आहेत