बर्याचदा ई-कॉमर्स साइटवर म्हणजे ॲमेझॉनसारख्या शॉपिंग साइटवर महागड्या वस्तूंवर, उपकरणांवर, स्मार्टफोन्सवर भरपूर ऑफर्स सुरू असतात. अनेकदा आपण घरबसल्या आपल्याला हवी ती वस्तू अशा वेबसाइटवरून ऑर्डर करत असतो. मात्र, प्रत्येकालाच ऑनलाइन पद्धतीने वस्तू मागवल्यानंतर त्याचा अनुभव चांगला येईलच असे नसते. कधी कधी ऑर्डर केलेली एखादी गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे येत नाही, वस्तुंची गुणवत्ता/क्वॉलिटी खराब असते, चुकीची पाठवलेली असते.
मात्र, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या एका पोस्टवरून, एका व्यक्तीला चक्क नकली आयफोन [iPhone] मिळाला असल्याचे समजते. एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावरून @GabbbarSingh नावाच्या अकाउंटवरून हा प्रकार शेअर झाला आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये व्यक्ती नेमके काय म्हणत आहे ते पाहू.
हेही वाचा : बापरे! नाकात ६८ काड्या घालून केला Guinness World Record! व्हायरल होणारा फोटो पाहा…
“वाह! @amazonIN वरून मला चक्क एक फेक आयफोन १५ डिलिव्हर झालेला आहे. फोन सेलरचं नाव अपेरीओ [Appario] असे आहे. तसेच त्याला ‘ॲमेझॉन चॉईस’ असा टॅगदेखील दिलेला आहे. फोनच्या बॉक्समध्ये केबलसुद्धा दिलेली नाही. एकदम फालतू. तुम्हाला कुणाला असा अनुभव आला आहे का?” असे म्हणत @GabbbarSingh ने डिलिव्हरी झालेल्या फोनचा फोटो शेअर केला आहे.
ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच, ॲमेझॉनने लगेचच त्याची दखल घेतली आहे. या फोटोवर रिप्लाय करून, “तुम्हाला आमच्याकडून असे चुकीचे उत्पादन डिलिव्हरी झाल्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत, तुमची सर्व माहिती या दिलेल्या लिंकवर पाठवावी, आम्ही ६ ते १२ तासांमध्ये आपल्याशी संपर्क करू”, असे उत्तर दिले आहे.
अकाउंट हॅण्डलरने, ॲमेझॉनने पाठवलेला फॉर्म भरून पाठवला असून, “लवकरात लवकर रिटर्नची सोय करावी”, असे स्वतःच्या पोस्टमध्ये अपडेट लिहिले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर अगदी काही वेळातच व्हायरल झाली. अनेक नेटकऱ्यांनी या प्रकारावर आपल्या प्रतिक्रिया लिहिल्या असून, काहींनी त्यांचे अनुभवदेखील सांगितले आहेत. नेटकरी नेमके काय म्हणाले पाहा.
हेही वाचा : काय! चक्क दोऱ्याने पलटले ऑमलेट!! Viral Video मधील ‘ही’ ट्रिक पाहून कपाळावर माराल हात
“माझ्याबरोबरही साधारण १५ दिवसांपूर्वी असेच झाले होते. मी मागवलेल्या आयफोनच्या डब्यात जुना अँड्रॉइड फोन मला मिळाला होता. बरं यावर ॲमेझॉनने मला कोणतीही मदत केली नाही. माझे पैसे वाया गेले. त्यामुळे माझी सर्वांना एकच विनंती आहे, ॲमेझॉनवरून कोणतेही महागडे उत्पादन मागवू नका”, असे एकाने लिहिले आहे. “मलाही असा अनुभव आला होता. म्हणजे मी आयफोन मागवला नव्हता; परंतु मागवलेल्या अँड्रॉइड फोनसाठीसुद्धा पैसे मोजले होते. पण, मला चक्क रिकामा डबा डिलिव्हर झाला होता. यावर ॲमेझॉनकडून कोणतीही मदत झाली नाही. तेव्हापासून मी ॲमेझॉनवरून गोष्टी मागवणे बंद केले”, असे दुसऱ्याने लिहिले. “चक्क फेक आयफोनच्या स्क्रीनवर ग्लास इन्स्टाल करून मिळाली?” असा प्रश्न तिसऱ्याने केला आहे.
एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावरून शेअर झालेल्या या पोस्टला आत्तापर्यंत १.४ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.