वर्षातील सर्वात शेवटचा सण म्हणजे ख्रिसमस. डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा एकंदरीतच फार उत्साहाचा, मजामस्तीचा असतो. कारण- ख्रिसमस आणि न्यू इयर निमित्त ऑफिसेसमधून विविध उपक्रमांचे आणि पार्ट्यांचे नियोजन केले जाते. अशामध्येच, सगळ्यांचा लाडका खेळ म्हणजे सिक्रेट सांतासुद्धा तितक्याच आवडीने खेळला जातो. या खेळात, ऑफिसमधील किंवा तुमच्या मित्रांच्या ग्रुपमधील सर्वांची नावे चिट्ठीवर लिहून, ज्याला ज्या नावाची चिट्ठी येईल त्याने त्या व्यक्तीला एखादी भेटवस्तू द्यायची असे असते. त्यामुळे आपल्या सह-कर्मचाऱ्यांसोबत, मित्र-परिवारासोबत आपले संबंध अधिक चांगले होतात.
परंतु अनेकदा असे होते कि, कुठलीतरी व्यक्ती फारच उत्साही असते आणि समोरच्यासाठी ते बरेच काहीतरी करून एखादी विशेष भेटवस्तू देतात. मात्र त्याच व्यक्तीला जर अतिशय सामान्य किंवा अपेक्षेपेक्षा कमी काही मिळाले तर त्याला वाईट वाटू शकते, त्याचा मूड खराब होऊ शकतो; जे स्वाभाविक आहे. असेच काहीसे एका ऑफिस कर्मचाऱ्यासोबत झाले असल्याची माहिती, न्यू यॉर्क पोस्टच्या लेखावरून समजते. त्यांच्या म्हणण्यानुसार एका व्यक्तीने, “मी पुन्हा कधीही सिक्रेट सांता खेळणार नाही” असे म्हणत टिकटॉक वर एक व्हिडीओ शेअर केला होता. याचे कारण म्हणजे, त्याला मिळालेली भेटवस्तू.
हेही वाचा : ‘मित्शी इंडिया’ कंपनीच्या सीएफओने चक्क हाताने लिहिले राजीनामा पत्र; सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो पाहा
त्या व्यक्तीने आपली ओळख सांगितली नसली तरीही, एक निळ्या रंगाच्या खोक्यात त्याची भेटवस्तू होती हे त्याच्या व्हिडिओमध्ये दिसते. “मी ज्याला भेटवस्तू दिली त्याच्या खोक्याला बाहेरून दिव्यांच्या माळा लावल्या होत्या. आत मध्ये कितीतरी वस्तू भरल्या होत्या. मी केवढं काय-काय केलं होतं!! काहीकाही वेळेस कुणाला काहीच मिळत नाही त्यामुळे मला आलेल्या व्यक्तीसाठी मी शक्य असेल तर सर्व काही केलं.”
हे सगळं सांगणाऱ्या त्या व्यक्तीला त्याची भेटवस्तू मिळण्यासाठी एक दिवस थांबावे लागल्याचे, न्यू यॉर्क पोस्टच्या माहितीवरून समजते.
“मी ऑफिसमध्ये गेलो, आणि अखेरीस मला माझी भेटवस्तू मिळाली. मी ते खोके उघडून पहिले आणि आतमध्ये फक्त चॉकलेट्स होती. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, वस्तू घेण्यासाठी २५ डॉलर्स [जवळपास २ हजार रुपये] इतकी मर्यादा होती. मला माहित आहे कि ही चॉकलेट्स महागडी आहेत, पण तरीही! तिने कदाचित या खोक्याच्या सजावटीवरच जरा जास्त खर्च केला असावा, कारण तोच खूप ‘फॅन्सी’ दिसतो आहे.” असे म्हणत त्या टिकटॉक वापरकर्त्याने आपली सिक्रेट सांताची व्यथा सर्वांसमोर मांडल्याचे समजते.
यावर नेटकऱ्यांनी देखील काही प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहू.
हेही वाचा : “जमत नाही, तर ऑर्डर कशाला करता?” फ्लिपकार्ट कर्मचाऱ्याच्या या वाक्यावर नेटकरी नाराज; पाहा काय आहे नेमके प्रकरण….
एकाने, “मी असतो तर तो डबा ऑफिसमध्ये तसाच ठेऊन, त्यावर’खाऊ’असे लिहून तिथे सोडून दिला असता” असे म्हंटले आहे. दुसऱ्याने, “मला अजूनही माझ्या आधीच्या ऑफिसमधील सिक्रेट सांताची भेटवस्तू मिळाली नाहीये. मला तो व्यक्ती रोज, ‘ मी भेटवस्तू घेऊन येणार आहे’ असे सांगत राहिला आणि पुढच्या आठवड्यात नोकरी सोडून गेला.” अशी आपली आठवण सांगितली आहे.