केरळमधील इडुक्की येथील रहिवाशी असणाऱ्या एका ३२ वर्षीय विवाहित व्यक्तीबरोबर एक विचित्र प्रकार घडला आहे. स्कूटर चालवताना हेल्मेट न वापरल्याने त्याचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आले आहेत. याप्रकरणी संबंधित व्यक्तीच्या पत्नीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विविध कलमांअंतर्गत आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
इडुक्की येथील रहिवाशी असणारी एक व्यक्ती २५ एप्रिल रोजी आपल्या मैत्रिणीबरोबर शहरात स्कूटरवरून फिरत होती. यावेळी त्याने हेल्मेट परिधान केला नव्हता. हा प्रकार रस्त्यावरील वाहतूक विभागाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. वाहतूक नियम मोडल्यामुळे वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फोटोसह आर्थिक दंडाचे चलन दुचाकीच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवलं. ही स्कूटर संबंधित व्यक्तीच्या बायकोच्या नावावर नोंदणीकृत होती. तसेच याला बायकोचाच मोबाइल क्रमांक जोडला होता.
त्यामुळे वाहतूक नियम मोडल्याचा मेसेज थेट बायकोच्या मोबाइल क्रमांकावर आला. त्यामुळे पतीच्या प्रेमप्रकरणाचा थेट पुरावाच बायकोच्या हाती लागला. यानंतर पीडित महिलेनं आपल्या पतीबरोबर दुचाकीवर बसलेल्या महिलेची माहिती काढली असता तिच्याशी पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड झालं. याबाबत पतीला जाब विचारला असता त्याने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दुचाकीवरील महिला अनोळखी असून आपण तिला केवळ लिफ्ट दिली होती, असं स्पष्टीकरण पतीने दिलं.
हे प्रकरण दडपण्यासाठी पतीने पत्नीला दमदाटी करत मारहाण केली. दोघांमधील वाद वाढत गेल्यानंतर पत्नीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मारहाणीसह इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत पतीला अटक केली. आरोपी पतीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.