Madhya Pradesh Patient Viral video: मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये एक अजब प्रकार घडला आहे. एका खासगी रुग्णालयातून हातात लघवीची पिशवी, तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून एक रुग्ण अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर पळताना दिसला. रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप केला की, त्याच्या कुटुंबाकडून १ लाख रुपये उकळण्यासाठी त्याला बंदी बनवून ठेवले होते. रुग्ण कोमात गेला असल्याचे सांगून रुग्णालयाकडून पैसे उकळण्याचा अशाप्रकारे भांडाफोड झाला आहे. रुग्णालयाने सदर रुग्ण कोमात गेला असल्याचे सांगितले होते. मात्र आयसीयूमधून रुग्ण स्वतःच्या पायवर पळत बाहेर गेला. यामुळे आता मोठा भ्रष्टाचार उघड झाला आहे.
फ्रि प्रेस जर्नलने याबाबतचे वृत्त दिले आहे. रतलाम येथील दीनदयाल नगरमधील बंटी निनामा नावाचा व्यक्ती हाणामारीत जखमी झाल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो कोमात गेला आहे, असे रुग्णालयाने सदर रुग्णाच्या कुटुंबाला सांगितले. त्यामुळे त्याला तातडीने उपचार द्यावे लागणार असून त्यासाठी बरेच पैसे लागतील, असेही सांगितले. रुग्णाचे आयुष्य वाचविण्यासाठी कुटुंबियांनी कसेबसे पैसे जमवले.
पण नंतर जे झाले, त्यामुळे सर्वच जण चकीत झाले आहेत. जो बंटी कोमात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तो बंटी आयसीयूमधून स्वतःच्या पायावर बाहेर आलेला पाहायला मिळाला. त्याच्या एका हातात लघवीची पिशवी होती, तोंडाला ऑक्सिजन मास्क होता आणि अर्धनग्न अवस्थेत तो रुग्णालयाबाहेर आला आणि त्यामुळे रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडा पडला.
रतलाम के एक निजी अस्पताल में एक व्यक्ति किसी वजह से भर्ती हुआ
— ??Jitendra pratap singh?? (@jpsin1) March 6, 2025
अस्पताल वालों ने से एडमिट कर दिया और बाहर उसके परिजनों को कहा कि मरीज कोमा में है बहुत बुरी कंडीशन में है आप लोग पैसे का इंतजाम करके आईये
मरीज यह बात सुन रहा था
फिर दौड़ कर बाहर आया कहा कि मैं बिल्कुल ठीक हूं मैं… pic.twitter.com/jajSE7qV4S
बंटी निनामाने सांगितले की, रुग्णालयातील पाच कर्मचाऱ्यांनी त्याला बळजबरीने अडवून ठेवले होते. तसेच त्याच्या कुटुंबियांकडून मोठी रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे तो आयसीयूमधून पळून जाण्याची संधी शोधत होता. संधी मिळताच तो अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर आला.
या घटनेबद्दल माहिती देताना बंटीची पत्नी म्हणाली, डॉक्टरांनी सांगितले की, माझ्या पतीला गंभीर दुखापत झाली असून तो कोमात गेला आहे. त्यांनी आम्हाला जी जी औषधे आणायला सांगितली, ती सर्व आम्ही आणून दिली. त्यानंतर त्यांनी आम्हाला उपचारासाठी एक लाख रुपये जमा करण्यास सांगितले. आम्ही नातेवाईकांच्या हातापाया पडून पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत होतो.
आता बंटिचा रस्त्यावर आल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांनी हॉस्पिटलच्या असंवेदनशील वृत्तीचा निषेध करून हा मोठा भ्रष्टाचार असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी रुग्णालयावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.