जपानमधील एका व्यक्तीनं त्याची आवडती फेरारी गाडी घेण्यासाठी दहा वर्ष पैसे जमवले. पै पै जमवून गाडी विकत घेतल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. पण डिलिव्हरी मिळाल्यानंतर अवघे काही मिनिटं गाडी चालवली आणि पुढे गाडीच्या इंजिनला आग लागून डोळ्यादेखत गाडीची राख झाली. द सनने दिलेल्या बातमीनुसार, ३३ वर्षीय संगीत दिग्दर्शक होनकॉन यांनी फेरारी विकत घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी बचत सुरू केली. त्यानंतर त्यांनी फेरारी ४५८ स्पाइडर ही गाडी विकत घेतली.

जपानमधील एका व्यक्तीनं एक्सवर पोस्ट टाकून सदर घटनेची माहिती दिली आहे. डिलिव्हरी मिळाल्यानंतर काही तासातच आलिशान गाडी स्वाहा झाली. फेरारीचे मालक होनकॉन म्हणाले, जपानमध्ये असा दुर्दैवी प्रकार घडलेला कदाचित मी एकमेव व्यक्ती असेन.

फेरारी ४५८ स्पाइडर या मॉडेलची गाडी त्यांनी विकत घेतली होती. जपानमध्ये या गाडीची किंमत भारतीय रुपयांनुसार २.६ कोटी असल्याचे सांगितले जाते.

नेमके प्रकरण काय?

गाडी ताब्यात मिळाल्यानंतर होनकॉन यांनी टोक्योच्या रस्त्यावर फेरारी चालविण्याचा आनंद घेतला. काही वेळाने त्यांना गाडीतून धूर निघत असल्याचे कळले. डिलिव्हरीनंतर काही तासांतच गाडीने पेट घेतला. अपघातामुळे आग लागल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही.

गाडीतून धूर येत असल्याचे कळताच होनकॉन यांनी गाडी थांबवली आणि बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. वेळीच बाहेर पडल्यामुळे होनकॉन यांना काही दुखापत झाली नाही. याहू जपानने दिलेल्या बातमीनुसार, त्यांना पेटती गाडी वाचविता आली नाही. एका महामार्गालगत तब्बल २० मिनिटे फेरारी जळत होती. हा दुर्दैवी प्रकार बाजूने जाणारे वाहनचालकही बघत होते.

टोक्यो पोलिसांनी आता या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.