Man Serving Chai On Flight Video Viral : तुम्ही ट्रेन, बसमधून प्रवास करताना चहा विक्रेते चाय ले लो चाय म्हणून ओरडताना ऐकलं असेल. प्रवासादरम्यान डोळ्यांवरील झोप घालवण्यासाठी आणि थोडं ताजेतवानं होण्यासाठी म्हणून प्रवासी या विक्रेत्यांकडून चहा विकत घेतात. बस, ट्रेनमध्ये असे चहा विक्रेते पाहायला मिळणं सामान्य आहे. पण, तुम्ही कधी विमानात अशा प्रकारे चहा विक्री केली जाताना पाहिलं आहे का? वाचून आश्चर्य वाटेल; पण खरंच एक चहाविक्रेता भरविमानात प्रवाशांना चहा देताना दिसला, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात एक प्रवासी (6E) सहप्रवाशांना चहा देताना दिसत आहे. व्हिडीओनुसार, चहा देणारा माणूस इंडियन चायवाला म्हणून ओळखला जातो, ज्याचे इन्स्टाग्रामवर ४० हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यानं हा व्हिडीओ केबिन क्रूच्या कोणत्याही विरोधाशिवाय विमान उड्डाणादरम्यान शूट केला आहे. हा व्हिडीओ पाहून आता अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विक्रेत्याला अशा प्रकारे विमानात चहा विकण्याची परवानगी कोणी आणि कशी दिली? त्याशिवाय इंडिगोचे केबिन क्रू आणि पायलट यांनी त्याला असे करताना थांबवलं नाही का?
विमानात प्रवाशांना आरामात विकतोय चहा
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती विमानामध्ये थर्मासमधून आणलेली चहा घेऊन प्रवास करत होता. पण, विमानानं उड्डाण घेताच त्यानं चहाचा थर्मास बाहेर काढला आणि एक एक ग्लास भरून चहा प्यायला दिला. अशा प्रकारे त्यानं एकेक करून अनेक प्रवाशांना चहा दिला. यावेळी तो चहा चहा म्हणून ओरडतानाही दिसला.
हा मजेशीर व्हिडीओ @indian_chai_wala नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर मोठ्या संख्येने लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले- ती ट्रेन होती; फ्लाइट नाही. दुसऱ्याने लिहिले- विमानाच्या तिकिटाची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे हे सर्व पाहायला मिळत आहे. तिसऱ्याने लिहिले- लग्नासाठी खासगी विमान भाड्याने घेतले आहे.