सोशल मीडियाच्या आजच्या जगात अनेक पोस्ट किंवा घटना सतत व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडिओ, फोटोंमुळे तर एका रात्रीत एखादी व्यक्ती स्टार बनल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. यासोबत अनेकदा गरजूंना मदत करण्यासाठीही सोशल मीडियाचा मोठा उपयोग होतो. अशातच सध्या मुंबईतल्या एका लिट्टी-चोखा विक्रेत्या तरुणाची सोशल मीडियावर चर्चा आहे. कारण फक्त त्याच्याकडील स्वादिष्ट लिट्टी-चोखा नाहीये, तर आघाडीची फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने आता त्याच्या मदतीसाठी पुढाकार घेतलाय. योगेश नावाचा हा तरुण मुंबईत अवघ्या २० रुपयांमध्ये एक प्लेट लिट्टी-चोखा विकतो. पण या कामासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागतो. अलिकडेच प्रियांशू नावाच्या एका ट्विटर युजरने योगेशचा संघर्षमय प्रवास इंटरनेटवर शेअर केला होता. त्यानंतर योगेशची चर्चा सुरू झाली.

प्रियांशुने शेअर केलेली पोस्ट :-
“या तरुणाचं नाव योगेश आहे, तो वर्सोवा बीचजवळ सर्वात मस्त लिट्टी-चोखा विकतो, तेही फक्त 20 रुपये प्लेट…यात तुम्हाला स्वादिष्ट चोखा, बटर लावलेल्या दोन लिट्टी, चटणी आणि सलाड मिळतं. झोमॅटोवर लिट्टी विकण्याचा त्याचा प्रयत्न आहे, पण त्यासाठी प्रक्रिया काय आहे, किंवा कोणाशी संपर्क करावा याबाबत त्याला काहीही माहिती नाहीये. सध्या आर्थिक चणचण आणि कठीण काळाचा सामना करतोय असं त्याने मला सांगितलं. यासोबतच, ‘भैया महीने का किराया नहीं निकल पा रहा हूं, ऊपर से यहां सभी को पैसे देने पड़ते हैं’, असं तो म्हणाला. आता तो त्याचं दुकान बंद करण्याचा विचार करतोय, मी झोमॅटोला विनंती करतो की कृपया याची मदत करा. यापेक्षा चांगला लिट्टी-चोखा कुठेही मिळणार नाही याची मी गॅरंटी देतो”, अशी पोस्ट प्रियांशूने केली होती.


झोमॅटोचं उत्तर :-
सोशल मीडियावर प्रियांशूची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अखेर झोमॅटोनेही उत्तर दिलं आहे. “हाय प्रियांशु, उत्तर देण्यासाठी उशीर झाल्याबद्दल क्षमस्व…जर शक्य असेल तर त्याचा संपर्क क्रमांक आम्हाला द्यावा, आमची टीम तातडीने योगेशसोबत संपर्क साधून झोमॅटोच्या प्रक्रियेबाबत त्यांना सर्व माहिती देईल”, असं झोमॅटोने म्हटलंय.


दरम्यान, योगेशबाबतची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियातून सामान्य नेटकऱ्यांनीही योगेशच्या मदतीसाठी प्रयत्न केले. जर तुम्ही मुंबईत रहात असाल तर योगेशची मदत करा , तो वर्सोवा दफनभूमीजवळ सिग्नलच्या दुसऱ्या बाजूला त्याचं दुकान लावतो असं आवाहन नेटकऱ्यांकडून केलं जात होतं. त्यानंतर आता झोमॅटोने प्रतिसाद दिल्यामुळे नेटकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.

Story img Loader