Shocking Stunt Video : काही मंडळींना स्टंटबाजीची भारीच हौस असते. अजब आणि जीवघेणी स्टंटबाजी करीत त्यांना दुसऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात खूप रस असतो. अनेकदा सोशल मीडियावर अशा स्टंटबाजीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, कोणत्याही सुरक्षेशिवाय असे स्टंट करणे जीवावर बेतू शकते. तुम्ही जत्रेत कधी गेला असाल, तर तिथे आकाशपाळण्यावर स्टंटबाजी करणारे लोक पाहिले असतील. सध्या एका जत्रेतील अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्याही हृदयात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. कारण- या व्हिडीओमध्ये व्यक्ती फिरत्या आकाशपाळण्यावर चढून ज्या प्रकारे लटकून उड्या मारत स्टंट करतेय ते खरंच जीवघेणे आहेत.
आकाशपाळणा म्हटलं तरी अनेकांच्या पोटात गोळा येतो. अनेकांना गगनचुंबी पाळणा फिरू लागताच काही क्षण अवतीभवती सर्व काही गरगर फिरू लागल्यासारखे वाटते. काहींना उलट्यासुद्धा होतात. पण, एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मात्र फिरत्या आकाशपाळण्याच्या झुल्यांवर लटकून जीवघेणे स्टंट करतेय; जे पाहून सर्वच जण थक्क झाले आहेत.
गरगर फिरणाऱ्या पाळण्याच्या वेगाबरोबर व्यक्तीची स्टंटबाजी सुरु
स्टंटबाजीचा ज्यांना चांगला सराव आहे, तेच चांगल्या प्रकारे स्टंट करू शकतात आणि त्याच लोकांचे स्टंट पाहताना आपल्यालाही मजा येते. तुम्ही जत्रेतील आकाशपाळण्यावर चढून स्टंटबाजी करणारे पाहिले असतील. व्हिडीओमध्येही तसाच एक स्टंटमॅन आपली अदाकारी दाखवीत आहे; जो भल्यामोठ्या फिरत्या आकाशपाळण्यातील एका पाळण्यावरून दुसऱ्या पाळण्यावर अंग झोकून देत उड्या मारतोय, लटकतोय. पाळणा मोठ्या वेगाने गरगर फिरतोय; पण त्या वेगाबरोबरच त्या तरुणानेही आपली स्टंटबाजी सुरूच ठेवलीय. कधी पाळण्याच्या रॉड्सवर, तर कधी तो पाळण्यावर हात मोकळे ठेवून उभा राहतोय. आश्चर्याची बाब म्हणजे पाळणा ज्या दिशेने झुलतोय, त्या दिशेने स्वत:चे शरीर झुकवून, तो बॅलन्स करतोय. आकाशपाळण्यावर अशा प्रकारची स्टंटबाजी आयुष्यात कधी कोणी पाहिली नसेल.
हा व्हिडीओ @terakyalenadena नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्यावर लोकांनी वेगवेगळ्या अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, असे खरे कलाकार आता फार कमी आहेत. तर दुसऱ्याने लिहिलेय की, या व्यक्तीने या स्टंटसाठी कठोर सराव केला असावा. तिसऱ्याने लिहिलेय की, असे प्रतिभावान लोक आपल्या देशाबाहेर जाऊ नयेत. दरम्यान, अनेकांनी अशा प्रकारची स्टंटबाजी जीवघेणी ठरू शकते, असे म्हणत लोकांनी सरावाशिवाय असे प्रयत्न करू नयेत, असा सल्ला दिला आहे.