जगण्याची जिद्द असेल तर माणूस मरणाला देखील हुलकावणी देतो. केवळ जगण्याची जिद्द आणि आपल्या लहान मुलींना भेटण्याची इच्छा यामुळे एका वडीलांनी तब्बल २९ तास मृत्यूशी झुंज दिली. बोटीने फिरायला गेले असताना ब्रेट आर्चीबल्ड हे तोल जाऊन अपघाताने समुद्रात पडले. रात्रीची वेळ असल्याने कोणाच्याही ते लक्षात आले नाही. त्यामुळे तब्बल २९ तास ते समुद्राच्या पाण्यावर मदतीची वाट बघत तरंगत होते.
आपल्या काही मित्रांसोबत ब्रेट हे इंडोनेशियाच्या सहलीवर गेले होते. एका बोटीतून त्यांची सफर सुरू होती. मात्र एके रात्री ते अचानक तोल जाऊन समुद्रात पडले. त्यांच्याजवळ लाईफ जॅकेट तर नव्हतेच पण रात्रीची वेळ असल्याने मदतीसाठी देखील कोणी नव्हते. त्यांनी कसेबसे बोटीवर जाण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी मदतीची वाट बघण्याखेरीज दुसरा कोणताच पर्याय त्यांच्याजवळ नव्हता. ते जवळपास २९ तास समुद्रात अडकून होते. या २९ तासांत त्यांच्यावर शार्क आणि जेलीफिशनेही जीवघेणा हल्ला केला. यातून ते कसेबसे वाचले. आपल्या दोन लहान मुलींना भेटण्याची इच्छा आणि त्यांच्यासोबत घालवलेले काही क्षण आठवून त्यांनी मनाला बळ देण्याचा प्रयत्न केला. ब्रेट बोटीवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या मित्रांनी शोधाशोध करायला सुरूवात केली. अखेर २९ तासांनंतर त्यांना शोधण्यात त्यांच्या मित्रांना यश आले. दिर्घ काळ मृत्यूशी झुंज देत समुद्रात राहिल्याने त्यांच्या शरीरावर जखमा तर झाल्याच आहेत पण त्यांचे ६ किलो वजनही कमी झाले. आपल्या जगण्याचा संर्घष आणि त्या २९ तासांचे वर्णन त्यांनी आपल्या डायरीमध्ये देखील लिहले आहे.