Peak Bengaluru Moment: भारतात हटके बिजनेस आयडिया शोधून काढणाऱ्यांची कमी नाही. अगदी छोटासा बिजनेसही अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा काही भन्नाट आयडिया शोधून काढल्या जातात की, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. त्यात भारताचे ‘स्टार्टअप कॅपिटल’ म्हणून ओळखले जाणारे बेंगळुरू शहर लोकांपर्यंत नवनव्या बिजनेस आयडिया पोहोचवण्यात नेहमीच आघाडीवर असते. बंगळुरूमधील नवनव्या बिजनेस आयडिया लोकांना आश्चर्यचकित करतात. अशात पुन्हा एकदा बंगळुरूमधील एक हटके बिजनेस आयडिया लोकांना प्रभावित करीत आहे. त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे; ज्यात चक्क रस्त्यावर चालते-फिरते कपड्यांचे शोरूम दिसते आहे.
फोटोत तुम्ही पाहू शकता की, मोबाइल वॉक-इन आउटफिटर शोरूमसारखा एक काळा ट्रक आहे; ज्याच्या आत अतिशय सुंदर, व्यवस्थितरीत्या कपडे लटकवले आहेत. या ट्रकच्या चारही बाजूंनी ट्रान्सपरंट काच लावली आहे; ज्यामुळे हा चालता-फिरता ट्रक एका हायफाय फॅशन शोरूमप्रमाणे दिसतोय.
Pakchikpak Raja Babu या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘WTF बंगळुरूच्या दुसर्या एपिसोडमध्ये माझ्या पत्नीसोबत मंदिरात जाताना हा ट्रक पाहिला.’ दरम्यान, हा फोटो आता सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
एका युजरने लिहिलेय, “या व्यक्तीने एखाद्या मोठ्या मॉल्समधील शोरूम्स जे करतात, ते करण्याचा प्रयत्न केलाय. हे खूप छान आहे.” दुसर्या युजरने लिहिलेय, “फूड ट्रक ऐकला; पण तो पाहिला नाही.” अनेकांना तरुणाची ही बिजनेस आयडिया फार आवडली आहे.