‘इच्छा तिथे मार्ग’ असं आपण नेहमी म्हणतो, त्यानुसार आपणाला जर एखादं काम मनापासून करण्याची इच्छा असेल तर ते काम, आपण कोणतंही कारण न देता पुर्ण करतो. शिवाय ते काम करताना एखादा अडथळा आला तरी काहीतरी जुगाड करुन आपण तो बाजूला करतो. कारण ते काम आपणला करायचंच असतं. सध्या अशाच एका जिद्दी दुकानदाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या जिद्दीला सलाम केला आहे.
सोशल मीडियावर वेगवेगळी जुगाड करणाऱ्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. मग अगदी ते टूथपेस्ट ठेवण्यापासून असो वा गाड्या पावसात भिजू नये म्हणून केलेले वेगवेगळे उपाय आपण इंटरनेटवर पाहिले आहेत. अशाच एका जुगाडू व्यक्तीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये एका व्यक्तीने दुकानासाठी जागा नाही म्हणून चक्क आपल्या मारुती 800 कारच्या छतावर दुकान सुरु केलं आहे.
या बहाद्दराने दुकानासाठी कारचं छत कापून, छतावर एक पत्र्याची टपरी तयार केली आहे. एखाद्या आलिशान कारला सनरुफ बसवलेलं असतं त्याच पद्धतीने त्याने मारुती 800 च्या छतावर दुकान तयार केलं आहे. शिवाय हा दुकानदार गाडीच्या कापलेल्या भागातून ये-जा करतो. तसंच या पानटपरीमध्ये त्याने पान, तंबाखू, सिगारेट सारखे पदार्थ विकायला ठेवल्याचं दिसतं आहे.
हेही वाचा- बाप असावा तर असा! मुलगी झाली म्हणून पाणीपुरी विक्रेत्यांने केलेल्या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक
दरम्यान, हा दुकानदार सोशल मीडियावर व्हायरल होत असून काही नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत, तर काही ट्रोल करत करतायत. “अशा प्रकारे कारची मोडतोड करणं हे मोटर व्हिकल्स नियमांचं उल्लंघन” असल्याचं काही नेटकरी म्हणतायत. तर “ही टेक्नॉलॉजी देशात बाहेर जाता कामा नये”, अशा कमेंट या फोटोवर येत आहेत. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील असल्याचं सांगितलं जात आहे. तर गाडीवर दुकान सुरु केलेल्या व्यक्तीचा फोटो ट्विटरवर आईपीएस अधिकारी पंकज नैन यांनी शेअर केला आहे. तर ‘इच्छा तिथे मार्ग’ असं कॅप्शन या फोटोला नैन यांनी दिलं आहे.