दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक व्यक्ती एक दोन दिवस किंवा महिने नव्हे तर तब्बल दोन वर्ष पैसे न देता राहिल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. शिवाय या व्यक्तीने हॉटेलमधील कर्मचार्‍यांच्या मदतीने या हॉटेलमध्ये दोन वर्ष मुक्काम केल्याचा आरोप हॉटेल व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे. शिवाय या व्यक्तीने हॉटेलचे ५८ लाख रुपये बुडवल्याचा दावादेखील करण्यात आला आहे.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ (आयजीआय) एरोसिटी येथे असलेल्या हॉटेल रोजिएट हाऊसने याप्रकरणी आयजीआय विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रोजिएट हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडचे ​​अधिकृत प्रतिनिधी विनोद मल्होत्रा ​​यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अंकुश दत्ता नावाच्या व्यक्तीने त्यांच्या हॉटेलमध्ये तब्बल ६०३ दिवस मुक्काम केला, ज्याचे भाडे ५८ लाख रुपये झाले होते, परंतु तो पैसे न देता हॉटेल सोडून गेला, असा आरोप करण्यात आला आहे.

हेही पाहा- खाटेवर चढून चक्क घोड्यासारखा भन्नाट डान्स करतोय उंट, व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

हॉटेलच्या ‘फ्रंट ऑफिस डिपार्टमेंट’चे प्रमुख प्रेम प्रकाश याने नियमांचे उल्लंघन करून दत्ता याला हॉटेलमध्ये बराच काळ राहण्याची परवानगी दिल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. तक्रारीतील माहितीनुसार प्रकाशला हॉटेलमधील खोलीचे भाडे ठरवण्याचा अधिकार होता, तसेच हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या बिलाची माहिती ठेवणाऱ्या संगणक प्रणालीमध्ये प्रवेश करण्याचा अधिकारदेखील होता.

हेही वाचा- देशाचे पंतप्रधान कोण? या प्रश्नाचं पतीला उत्तर न देता आल्याने पत्नीने घेतला ‘हा’ धक्कादायक निर्णय

प्रकाशला दत्ता याच्याकडून काही रोख रक्कम मिळाली असावी असा संशय हॉटेल व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. शिवाय हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांचे रेकॉर्ड ठेवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रणालीशी प्रकाशने छेडछाड करून दत्ता याचा मुक्काम वाढवण्यास मदत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

एफआयआरमध्ये म्हटले आहे की, “अंकुश दत्ताने चुकीच्या मार्गाने हॉटेलमध्ये राहण्यासाठी, प्रेम प्रकाशसह काही हॉटेल कर्मचार्‍यांच्या साह्याने प्लॅन केला.” हॉटेलने दावा केला आहे की, दत्ता याने ३० मे २०१९ रोजी एका रात्रीसाठी हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. शिवाय त्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३१ मे २०१९ रोजी हॉटेल सोडायचे होते, परंतु तो २२ जानेवारी २०२१ पर्यंत तिथेच राहिला. हॉटेल व्यवस्थापानाने दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असून, खात्यांमध्ये छेडछाड करून विश्वासघात, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास आयजीआय पोलीस करत आहेत.