अमेरिकेत एका विचित्र प्रकरणात पोलिसांनी एका गाडी चालकाला अटक केली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या या गाडीचा पाठलाग करत पोलिसांनी या चालकाला अटक केली. मात्र पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करुन ती थांबली तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण हा व्यक्ती चक्क आपल्या कुत्र्याला गाडी चालवायला शिकवत होता. पोलिसांनी गाडी थांबली तेव्हा स्टेअरिंगवर कुत्राच होता. हा सर्व प्रकार वॉशिंग्टनमध्ये घडला आहे.
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार २९ मार्च रोजी घडला. एका व्यक्तीने पोलीस कंट्रोल रुमला फोन करून एका भरधाव वेगातील गाडीने दोन गाड्यांना टक्कर दिल्याचे या व्यक्तीने सांगितले.
“एकाच वेळी आपत्कालीन नियंत्रण कक्षामध्ये अनेकांचे फोन आले. त्यांनी एक व्यक्ती रस्त्यावर १०० माइल्स (१६० किमी) प्रती तास वेगाने बेजबाबदारपणे गाडी चालवत असल्याची तक्रार केली,” अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी असणा-या हॅथर अॅकस्टमॅन यांनी दिली. पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करुन ती थांबली तेव्हा त्यांना धक्काच बसल्याचे हॅथर यांनी सांगितले. या गाडीच्या स्टेअरिंगवर म्हणजेच चालकाच्या जागी एक पितबुल जातीचा कुत्रा होता. तो आपल्या पुढच्या दोन पायांनी स्टेअरिंग फिरवत होता. तर बाजूच्या सीटवर बसलेला त्याचा मालक गॅस पेडलवर नियंत्रण ठेवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले, असं हॅथर म्हणाल्या.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अलबार्टो टीटो अलजनार्डो असे असून त्यांच्याविरोधात अंमली पदार्थांचे सेवन करुन गाडी चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहेत. “अलबार्टोला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने मी माझ्या कुत्र्याला गाडी चालवायला शिकवत होतो असं सांगितलं. मागील अनेक वर्षांपासून मी पोलीस म्हणून काम करत आहे. मात्र आतापर्यंत कधीच मी असं कारण ऐकलं नव्हतं,” असं हॅथर यांनी सांगितलं.
या प्रकरणात अलबार्टो अटक केली असून त्याच्या कुत्र्याला पाळीव प्राण्यांची देखभाल केली जाते अशा ठिकाणी ठेवण्यात आलं आहे.