Man Thrashed With Sticks By Petrol Pump Staff: तेलाच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. अनेक वेळा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना लोकांची फसवणूक होते. त्यामुळे बऱ्याच वेळा ग्राहक तक्रार करतात. पण एका ग्राहकाला तक्रार करणं चांगलंच महागात पडलं. उलट तक्रार करताच कर्मचारी भडकले आणि अक्षरश: काठीने ग्राहकाला मारहाण करू लागले. या अमानुष मारहाणीचा संतापजनक प्रकार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊ…

गेल्या काही दिवसांत देशात मारहाणीच्या घटना वाढल्यात. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पेट्रोल पंपावरील काही कर्मचारी एका ग्राहकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील आहे, जिथे एका तरुणाने कमी पेट्रोल दिल्याची तक्रार केली होती. कर्मचाऱ्यांनी पैसे पूर्ण घेऊन गाडीमध्ये कमी पेट्रोल भरले. त्यामुळे ग्राहक भडकला आणि कर्मचाऱ्यांकडे तक्रार करू लागला. तक्रार करणे त्या तरुणाला इतके महागात पडले की, तिथे उपस्थित असलेल्या दोन-तीन कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर काठ्यांनी हल्ला केला. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, ग्राहकाने विरोध करताच कर्मचारी त्याला घेरतात आणि मारहाण करण्यास सुरुवात करतात. तो तरुण पळून जाण्याचा प्रयत्न करतो; पण त्याला सर्व बाजूंनी घेरून मारहाण केली जाते.

व्हिडीओमध्ये असे दिसते की, एकाच वेळी तीन-तीन जण त्या ग्राहकाच्या अंगावर धावून गेले. आणि त्याला काठीने मारहाण करू लागले. तर जवळ उभे असलेले लोक फक्त तमाशा पाहत असल्याचे दिसत आहे. कोणीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत नाही. या घटनेमुळे इंटरनेटवर वादविवाद सुरू झाला आहे आणि लोकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. व्हिडीओच्या शेवटी ग्राहक पेट्रोल पंप ऑपरेटरशी वाद घालताना दिसत आहे आणि व्हिडीओ रेकॉर्ड करणारे लोकदेखील या घटनेवर संताप व्यक्त करतात आणि पेट्रोल पंपावर कमी इंधन दिल्याचा आरोप करतात. या व्हिडीओने आता इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

नेटिझन्सकडून तीव्र प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट केली, “याला चोरी आणि अहंकार म्हणतात. प्रशासनाचा यात सहभाग असू शकतो.” दुसऱ्याने म्हटले, “सर्वांत मोठी समस्या म्हणजे लोक अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नाहीत.” अनेक वापरकर्ते म्हणतात की, अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”

पोलिस कारवाई आणि तपास

पोलिसांनी या प्रकरणाचा तपासही सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ एप्रिल २०२५ रोजी फिरोजाबादमधील स्टेशन रोड पेट्रोल पंपावर घडली. पीडित ग्राहक आलोक यांच्या तक्रारी आणि व्हायरल व्हिडीओच्या आधारे तपास सुरू आहे. तक्रारीवरून आणि समोर आलेल्या व्हिडिओवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सहभागी असलेल्या तीन आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे.

व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल

या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक व्ह्युज आणि पाच हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. त्याशिवाय पोस्टवर ९० हून अधिक कमेंट्स आल्या आहेत, ज्या या घटनेबद्दल लोकांची तीव्र चिंता दर्शवतात.