Leopard Shocking Video Viral : बिबट्याला समोर पाहिल्यावर भल्या भल्यांच्या अंगावर काटा आल्याशिवायर राहत नाही. अतिशय चपळाईने शिकार करण्यात बिबट्या माहिर असतो. मानवी वस्तीत घुसून बिबट्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बिबट्याने माणसांची शिकार केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण कर्नाटकात एक आगळीवेगळी घटना घडली आहे. एका तरुणाने जिवंत बिबट्याला दुचाकीला बांधून रुग्णालय गाठल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ही घटना कर्नाटकच्या हासन जिल्ह्यातील बागिवलु गावात घडल्याचं समजते आहे. बिबट्याचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
TOI ने दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय वेणुगोपाल उर्फ मुथु दुचाकीवरून शेताकडे जायला निघाला होता. त्यावेळी त्याने शेतात असलेल्या एका बिबट्याला पाहिलं. पण तो बिबट्या आजारी असल्याचं त्याला समजलं. त्यानंतर त्याने बिबट्याला दुचाकीला बांधून उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात नेलं. परंतु, बिबट्याला दुचाकीला बांधत असताना या तरुणाला बिबट्याच्या झटापटीत दुखापत झाली.
इथे पाहा व्हिडीओ
बिबट्याला दुचाकीला बांधून त्या व्यक्तीने वन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला त्यांच्या वाहनात नेलं आणि उपचारासाठी पशु रुग्णालयात दाखल केलं. हासन डीसीएफ आशिष रेड्डीने म्हटलं की, बिबट्या डिहायड्रेटेड होता आणि त्याला चालताना अडचणी निर्माण होत होत्या. हा बिबट्या नऊ महिन्याचा आहे. शिकारीच्या शोधात कदाचित तो बिबट्या गावाच्या परिसरात आला असेल. बिबट्याची प्रकृती स्थीर आहे. बिबट्याला दुचाकीला बांधून नेण्याचा त्या व्यक्तीचा चुकीचा इरादा नव्हता.