अनेकदा सणासुदीच्या काळात म्हणा किंवा अशा वर्षा अखेरीस म्हणा, सर्व गाड्यांना भयंकर गर्दी असते. सध्या थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे रस्त्यावरील धुक्यामुळे किंवा एकंदरीत खराब हवामानामुळे काही गाड्या रद्द होण्याचीही शक्यता असते. अशी परिस्थिती ही खास करून उत्तर भारतामध्ये बघायला मिळते. उत्तरेकडील राज्यांमध्ये, शहरात थंडी-धुकं हे भरपूर प्रमाणात असते. गाडी चालवताना कधीकधी समोरचा रस्ताही धूसर दिसत असतो. परिणामी, काही बस किंवा रेल्वे रद्द कराव्या लागतात किंवा उशिराने धावत असतात. अशावेळेस याचा त्रास हा प्रवाश्यांना सहन करावा लागतो. असेच काहीसे कानपूरमधील एका व्यक्तीसोबत घडल्याचे त्याने एक्सवरून शेअर केलेल्या पोस्टमधून आपल्याला पाहायला मिळते.

या व्यक्तीला त्याची झाशीवरून निघणारी गाडी सुटू नये, यासाठी त्याला कानपूर ते झाशी अशी टॅक्सी करावी लागली आहे. याचे कारण म्हणजे, उशिराने धावणारी रेल्वे. त्याच्या सोबत घडलेल्या या घटनेबद्दल त्याने एक्स या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, सर्व हकीकत सांगितली आहे.

हेही वाचा : रेल्वेचे कन्फर्म तिकीट असूनही ‘दोन तास’ करावा लागला संपूर्णत: उभ्याने प्रवास! पाहा सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट….

“मला झाशीला रात्री ८:१५ वाजताची राजधानी गाडी पकडायची होती. त्यासाठी मला आधी कानपूर स्टेशनवर, दुपारी १:१५ वाजता येणारी गाडी घ्यावी लागणार होती. परंतु, कानपूरची रेल्वे नऊ तास उशिराने येणार असल्याची माहिती मला दुपारी २ वाजता समजली. त्यामुळे माझ्याकडे झाशीला पोहोचण्यासाठी टॅक्सी करून जाण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाच पर्याय उरला नव्हता. त्यामुळे माझा एकूण खर्च पाहायला गेलो तर, रेल्वेचे तात्काळ तिकीटाची किंमत झाली १५०० रुपये आणि मला फुकट टॅक्सी करावी लागली त्याचे ४,५०० रुपये झाले होते. म्हणजे मला एकूण सहा हजारांचा विनाकारण फटका बसला आहे”, असे @vinodepurate या एक्स हॅण्डलरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले असल्याचे आपण पाहू शकतो.

ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच, अनेक नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी त्यांच्यासोबतही असेच काहीसे घडले असल्याबद्दल सांगितले आहे.

एकाने, “माझ्या आत्याचा दिल्ली ते न्यूयॉर्कचा प्रवास, माझ्या दिल्ली ते पश्चिम बंगालच्या प्रवासापेक्षा जास्त जलद गतीने झाला. [गाडी १६ तास उशिराने येणार होती].” असे सांगितले. दुसऱ्याने, “मी गाडी क्रमांक १२७२४ तेलंगणा एक्स्प्रेस- हैद्राबाद एक्स्प्रेसमधून प्रवास करत होतो. ही गाडी सकाळी ७:१० वाजता स्टेशनवर पोहोचणे अपेक्षित होते, मात्र ती दुपारी ३:३० ला पोहोचली. माझी रात्री ८ वाजताची नाईटशिफ्ट होती, परंतु गाडी ९ तास उशिराने आली. आता माझ्या गेलेल्या पगाराची जबाबदारी कोण घेणार?” असा प्रश्न दुसऱ्याने केला आहे.

Story img Loader