Plastic Ban Awareness: प्लॅस्टिकच्या वापरावरून आजवर कित्येक राजकीय, सामाजिक चळवळी झाल्या आहेत. कित्येकवेळा सरकारने सिंगल युज म्हणजेच केवळ एकदा वापरता येणाऱ्या कमी मायक्रॉनच्या प्लॅस्टिकवर बंदी आणली होती, पण ज्यांना वापरायचे ते प्लॅस्टिक वापरतातच. कधी चोरून तर कित्येक वेळा सर्रास उघडपणे प्लॅस्टिक पिशव्या वापरल्या जातात. यावरून होणाऱ्या हानीबद्दल जनजागृती करण्यासाठी अनिल चौहान या व्यक्तीने एक भन्नाट पराक्रम केला आहे. पीटीआयच्या माहितीनुसार, अनिल यांनी दीव दमण ते लखनऊ असा ११, ००० किमी सायकल प्रवास केला आहे.
अनिल चौहान यांनी आपल्या सात वर्षीय श्रेया आणि चार वर्षीय युक्ती या लेकींबरोबर हा प्रवास केला आहे, अनिल यांनी १ जानेवारीला प्रवास सुरू केला आणि गोवा, गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि मध्य प्रदेश असा एक एक पल्ला पार करून ते लखनऊला पोहोचले. या प्रवासात त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून कमी मायक्रॉनच्या प्लॅस्टिकपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
मला माझ्या गायींना वाचवायचंय..
अनिल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, देशातील बहुतेक गायी कचऱ्यात फेकले जाणारे प्लास्टिक खाऊन मृत पावतात. प्लॅस्टिक हे गायींमधील आजारांचे एक प्रमुख कारण आहे, प्लॅस्टिकमुळे आजवर अनेक गायींचा मृत्यू झाला आहे. जोपर्यंत याबाबत जनजागृती होत नाही तोपर्यंत उत्तर मिळणार नाही.
माझ्या लेकी पाठीशी आहेत..
अनिल त्यांच्यासोबत फक्त एक बॅग आणि दोन ब्लँकेट घेऊन निघाले होते. सूर्यास्तानंतर मंदिरे, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन किंवा धर्मशाळांमध्ये ते व त्यांच्या दोन कन्या थांबत होत्या. त्यांना या प्रवासात शाळा प्रशासन, गावप्रमुख आणि स्थानिकांकडूनही पाठिंबा मिळाल्याचे अनिल यांनी सांगितले आहे.
VIRAL: ‘या’ चुकीने ‘तो’ झाला ११,६७७ कोटींचा मालक; बँकेने पैसे परत घेण्याआधी केलं असं काही की…
“मी माझ्या मुलींसोबत माझ्या मिशनवर निघालो तेव्हा दमण आणि दीवमधील माझ्या गावातील लोकांनी माझी चेष्टा केली. पण हे माझे कर्तव्य आहे म्हणून मी ध्येय सोडले नाही.” असे अनिल म्हणाले. पत्नीचे निधन झाल्यापासून अनिल व त्यांच्या कन्या हे समाजकार्यासाठी जगत आहेत. मुलींना एकट्यात टाकून येणे शक्य नसल्याने त्या दोन्ही मुलींना सोबत घेऊन हा प्रवास करत असल्याचे अनिल यांनी सांगितले. त्यांना इथून पुढे बांगलादेशला जायचे आहे त्यासाठी स्वतःचे आणि दोन मुलींना व्हिसा मिळण्याची ते वाट पाहात आहेत.