भारतात जुगाडू लोकांची कमी नाही. एकापेक्षा एक असे लोक आहेत की, जे आपल्या बुद्धीचा वापर करीत अशा काही गोष्टी तयार करतात की, ज्या इतरांना सहजपणे जमणार नाहीत. त्यापैकी काही जण कारचे हेलिकॉप्टरमध्ये आणि बाइकचे कारमध्ये रूपांतर करण्यातही पटाईत आहेत. सोशल मीडियावरही अनेकदा देसी जुगाड करून बनवलेल्या विविध गोष्टी व्हायरल होत असतात; ज्या पाहून प्रत्येक जण आश्चर्य व्यक्त करतात. सध्या असाच एक देसी जुगाड व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही विचारात पडाल की, हे कसे शक्य झाले? कारण एका तरुणाने चक्क बाइकच्या हेडलाइटचे रूपांतर चक्क टीव्ही स्क्रीनमध्ये केले आहे.
बाइकच्या हेडलाइटचे काम प्रकाश देण्याचे असते हे तुम्हाला माहीत असेलच. रात्रीच्या वेळी ही हेडलाइट खूप गरजेची गोष्ट असते. परंतु, जर कोणी हेडलाइटचे रूपांतर टीव्ही स्क्रीनमध्ये केले तर? या संबंधित व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण बाइकवर बसला आहे आणि त्याच्याभोवती दोन ते तीन मुले उभी आहेत; तर एक व्यक्ती व्हिडिओ बनवत आहे. त्यात तो दाखवतोय की, बाइकच्या हेडलाइटमध्ये टीव्हीप्रमाणे गाणे वाजत आहे. ही हेडलाइट अगदी हुबेहूब टीव्ही स्क्रीनसारखीच दिसतेय; ज्याचा एक छोटासा लाऊडस्पीकरदेखील आहे आणि त्याचा आवाज दूरवर ऐकू येत आहे.
तुम्ही असा देसी जुगाड क्वचितच पाहिला असेल ना! हा व्हिडिओ prince_arts___ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर विविध मजेदार कमेंटस येत आहेत. या त्यांच्या कलाकृतीला कोणी ‘छंद ही मोठी गोष्ट आहे’, असे म्हणत आहेत. तर, कोणी ‘भारतात टॅलेंटची कमतरता नाही’ असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे एका युजरने ‘आता रात्री लाईट कशी पेटणार भाऊ’ असा प्रश्न विचारला आहे. तर, एकाने ‘जग खूप पुढे गेले आहे भाऊ; आम्हीच मागे राहिलो’, असे म्हटले आहे.