‘दो दोस्त एक प्याली में चाय पीयेंगे’, हा अंदाज अपना अपना चित्रपटातील संवाद तुम्हाला नक्कीच आठवत असेल. दोन मित्रांमधील प्रेम वाढण्यासाठी त्यांनी एकाच कपामध्ये चहा प्यावा असं हे लॉजिक होतं. एकाच कपातून चहा प्यायलाने प्रेम वाढतं हा डायलॉग आजही अनेक ठिकाणी कॉलेजच्या कट्ट्यापासून ते ऑफिस कॅन्टीनपर्यंत वापरला जातो. मात्र अमेरिकेमधील दोन मित्रांमधील नातं एवढं घट्ट आहे की एका मित्राने २२ मिलियन डॉलरची म्हणजेच १६५ कोटींची लॉट्री जिंकल्यानंतर त्यामधील अर्धी रक्कम मित्राला दिली आहे. बरं हे असं वन बाय टू करण्यामागे एक विशेष कारण आहे. ते कारण म्हणजे दिलेला शब्द.

नक्की वाचा >> …म्हणून त्याला बटर चिकनसाठी मोजावे लागले १ लाख ३२ हजार रुपये

ज्या विन्सकॉनसीन या मिशिगनमधील स्थानिक लॉट्रीमध्ये त्याला हे तिकीट लागलं होतं ती १९९२ साली सुरु झाली, तेव्हापासून हे दोघे लॉट्रीची तिकीटं काढायचे. मात्र कोणालाही आणि कितीही पैशाची लॉट्री लागली तरी रक्कम अर्धी अर्धी वाटून घेण्याचं या दोघांनी ठरवलं होतं. जुलै महिन्यामध्ये टॉम कूक याला ही लॉट्री लागली. लॉट्री जिंकल्याचे समजताच त्याने त्याचा मित्र जो फॅनीला फोन करुन अभिनंदन करत अर्धी रक्कम वाटून घेऊयात असं सांगितलं.  यासंदर्भातील वृत्त ‘द गार्डियन’ने दिलं आहे.

टॉम कूक आणि जो फॅनी मागील २८ वर्षांपासून लॉट्रीची तिकीटं काढत होते. मात्र कोणाही जिंकलं तर पैसे वाटून घेऊयात अशी डील त्यांनी २० वर्षांपूर्वी केली होती. त्यानुसार कूकने त्याचा शब्द पाळला आहे. “एकदा ठरलं म्हणजे ठरलं,” एवढीच प्रतिक्रिया कूकने यासंदर्भात बोलताना दिली होती. कूकने जेव्हा जो ला फोन करुन लॉट्रीच्या रक्कमेबद्दल सांगितले तेव्हा जो ला धक्काच बसला. त्यावेळेस जो ने कूकला हसत हसत जुन्या डीलची आठवण करुन दिली आणि कूकनेही लगेच होकार दिला. मला कधी लॉट्री लागेल असं वाटलं नव्हतं म्हणून मी त्या डीलला होकार दिला होता असंही कूक यासंदर्भात बोलताना म्हणाला.

नक्की वाचा >> २१ वर्षानंतर सापडलेल्या पोकीमॉन कार्डसाठी लागली इतक्या लाखांची बोली; तरुण झाला मालामाल

लॉट्री कंपनीने कूक आणि जो रक्कम वाटून घेणार असल्याचे सांगितले आहे. या दोघांना अधिकृतरित्या १६.७ मिलियन डॉलर म्हणजेच १२७ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर कर आणि इतर रक्कम वजा करुन त्यांना प्रत्येकी ५.७ मिलियन डॉलर मिळणार आहेत. म्हणजेच जो ला ४४ कोटी आणि कूकला ४४ कोटी रुपये मिळणार असल्याचे विन्सकॉनसीन लॉट्रीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

नक्की वाचा >> …तर पर्यटनासाठी आलेल्या परदेशी नागरिकांना ‘हा’ देश देणार दोन लाखांहून अधिक निधी

कूक आणि जो या दोघांनाही उतार वयामध्ये हे पैसे एकत्रच वेगवेगळ्या गोष्टींसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. कुटुंबाबरोबर भटकंतीसाठी प्रामुख्याने हा पैसा वापरणार असल्याचे या दोघांचे म्हणणे आहे.