जास्तीचे प्रवास भाडे आकारणारे टॅक्सी किंवा रिक्षाचालक आपल्याला अनेक भेटतील. कधी कधी दुप्पट भाडे आकारणे किंवा प्रवाशांना नकार देणारेही अनेक असतील. असे बरे- वाईट अनुभव अनेकदा प्रवास करताना आपल्याला येत असतात पण या प्रवासात कधी कधी काही चांगली माणसंही भेटतात, जी पैशांसाठी नाही तर समाजसेवा करण्यासाठी झटत असतात. मंगळूरुमध्ये राहणाऱ्या काव्या रावला असाच वेगळा अनुभव आला जो तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणलाय.
वाचा : जंक फूड खाऊन १० वर्षांच्या मुलाची झाली ही स्थिती
काव्याला तिच्या वडिलांना रुग्णालयात घेऊन जायचे होते. पण तिला टॅक्सी मिळत नव्हती. शेवटी तिने ओला कॅब बुक केली. ठरल्याप्रमाणे गाडी वेळेत तिच्या दारात पोहोचली आणि तिच्या वडिलांना घेऊन गाडीचा चालक रुग्णालयात पोहोचला. घर ते रुग्णालय असे १४० रुपये बील झाले. जेव्हा काव्याच्या आईने त्याला पैसे देऊ केले तेव्हा मात्र या चालकाने पैसे घेण्यास नकार दिला. मी पोट भरण्यासाठी हा व्यवसाय जरूर करतो. पण माझ्या गाडीतून प्रवास करणाऱ्यांना जर रुग्णालयात जायचे असेल तर मी त्यांच्याकडून पैसे आकारात नाही असे त्यांनी सांगितले. तो नेहमीच रुग्णालयात जाणाऱ्या प्रवाशांना मोफत सेवा देतो. काव्याच्या आईने पैसे घेण्याची त्याला वारंवार विनंती केली, पण तो चालक मात्र पैसे न घेता निघून गेला. सुनील असं या चालकाचं नाव. तेव्हा त्याच्या या चांगल्या कामाबद्दल सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. सगळेच चालक काही नफा कमवायला बसले नसतात काहींना पैशांपेक्षाही माणुसकी महत्त्वाची वाटते हे सुशीलने जगाला दाखवून दिले.