क्वारंटाइन सेंटरमध्ये काही लोकं नाचत असताना दिसले , किंवा काही जणांचे क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण मणिपूरच्या क्वारंटाइन सेंटरमधून वेगळीच घटना समोर आली आहे.

मणिपूरच्या तामेंगलाँग क्वारंटाइन सेंटरमधून दोन तरुणांनी आपल्या प्रेयसींना भेटण्यासाठी पलायन केलं. त्यानंतर थोड्या वेळाने ते परतले. पण परत आले तर त्यांच्याकडे गांजा, सिगारेट आणि दारुच्या बाटल्या होत्या. विशेष म्हणजे हे दोघं तरुण पळाले आणि परत आले तरी कोणाला याबाबत माहिती नव्हती. पण, क्वारंटाइन सेंटरमध्ये राहणाऱ्या अन्य व्यक्तींना दारु, सिगारेट आणि गांजाचं वाटप करताना अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं आणि त्यानंतर सर्व घटना उघडकीस आली.

तामेंगलाँगचे जिल्हा दंडाधिकारी आर्मस्ट्रॉंग पाम यांनी या घटनेविषयी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली. ‘हे दोघं प्रेयसीला भेटण्यासाठी पळाले होते. बाइकवरुन परत आल्यानंतर त्यांच्याकडे 8 लीटर देशी दारु, चार पॅकेट गांजा आणि सिगारेटची पाकीटं होती. या दोघांना आणि यांच्यासारख्या लोकांना काय शिक्षा द्यावी हे कळत नाही. जिल्हा प्रशासनाकडून त्यांना तुरुंगात पाठवले जाणार होते . पण करोनामुळे तुरुंग बंद आहेत’, अशी पोस्ट पाम यांनी केली आहे. सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे. पण, देशात क्वारंटाइन केंद्रांमध्ये किती गैरव्यवस्था आहे यावर मणिपूरच्या घटनेने पुन्हा प्रकाश टाकला आहे.

Story img Loader