रेल्वे प्रवास सुखकारक व्हावा म्हणून अनेक प्रवासी जास्तीचे पैसे खर्च करून एसी टिकीट घेतात पण तिथेही त्यांची निराशाच होत आहे. नुकताच एका प्रवाशाला रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक अनुभव आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. व्हिडीओ पाहून रेल्वे प्रवास करायचा तरी कसा असा प्रश्न अनेक प्रवाशांना पडला आहे.

एका प्रशांत कुमार या प्रवाशाला आरामदायी प्रवासाची अपेक्षा करत दक्षिण बिहार एक्सप्रेसमध्ये २००० रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करून एसी तिकीट बुक केले. पण आरावरून दुर्गला जाणाऱ्या धावणाऱ्या ट्रेनमध्ये त्याला चक्क अनेक उंदीर फिरताना दिसले. त्याने ताबडतोब १३९ वर रेल्वेच्या हेल्पलाइनवर ही समस्या कळवली आणि मदत मागितली.

काही वेळातच, रेल्वे कर्मचाऱ्यांनी डब्यात झुरळांसाठी वापरले जाणारे HIT कीटकनाशक फवारले. कुमार म्हणाले की, “रेल्वे कर्मचाऱ्यांनी समस्या सोडवण्याऐवजी डब्याच्या कीटकनाशक फवारून उंदरांना पळवण्याचा प्रयत्न करत होता. पण यामुळे कुमारच्या अडचणीत आणखी भर पडली, कारण त्याला उंदीरांबरोबर स्प्रेच्या त्रासदायक परिणामांचा सामाना करावा लागला.

रेडीटवर एका युजरने सीटवर फिरणाऱ्या उंदरांचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे जो पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला. त्याचबरोबर, त्याने लिहिले, “एसी टियर २ सीटसाठी २००० रुपयांपेक्षा जास्त पैसे दिले. उंदीर निघाले अन् रात्रीची झोप उडाली.”

ट्विटरवरील या घटनेचा व्हिडीओ पोस्ट करत प्रशांत कुमारने सांगितले की, “पीएनआर ६६४९३३९२३०, ट्रेन १३२८८, कोच ए१ मध्ये अनेक उंदीर, उंदीर सीट्स आणि सामानावरून फिरत आहेत. मी एसीसाठी एवढे पैसे का खर्च केले?

त्यानंतर आणखी एक ट्विट करत त्याने लिहिले की, “भारतीय रेल्वेची ही काय अवस्था झाली आहे. उंदरानी भरलेल्या ट्रेनसाठी ३००० च्या आसापास पैसे दिलेत”

भारतीय रेल्वेने अद्याप सोशल मीडिया पोस्टला प्रतिसाद दिलेला नव्हता.

सोशल मीडिया प्रतिक्रिया

त्या माणसाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केल्यानंतर, नेटिझन्सनी विनोदी आणि उपाहासात्कम प्रतिक्रियांनी कमेंट केल्या.

एका रेडिट वापरकर्त्याने लिहिले, “मजा करा, रेल्वे आता पाळीव प्राणी देखील पुरवते.”

“तुमचे तिकीट आरएसी असू शकते, ते तपासा. तुम्हाला दोघांनाही सीट शेअर करावी लागेल,” अशी कमेंट आणखी एका वापरकर्त्याने केली.

एका इंटरनेट वापरकर्त्याने त्यांचा स्वतःचा सिद्धांत मांडला: “आता मला समजले की पाळीव प्राण्यांना 2AC आणि 3AC मध्ये परवानगी का नाही.”

काहींनी चतुराईने त्यांच्या कमेंटमध्ये गाण्याचे बोल समाविष्ट केले:

“आज की ‘रात’ मेरे हुन्स का मजा आखों से लिजिए,” एका इंटरनेट वापरकर्त्याने म्हटले.

आणखी एकाने लिहिले की, “‘रात’एं लांबिया लांबिया रे.”