अँड्राईड फोनच्या गर्तेत जगप्रसिद्ध अशी नोकिया कंपनी कधी मागे पडली कळलेच नाही. काही वर्षांपूर्वी बाजारात केवळ नोकिया फोनचे वर्चस्व होते. पडला तरीही सुरक्षित, न तुटणारा आणि उत्तम अशी बॅटरी लाईफ यामुळे हे फोन सगळ्यांच्या पसंतीस उतरले होते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी जवळपास प्रत्येकांच्या हातात नोकियाचेच फोन दिसायचे. एकवेळ जमीन तुटेल, ज्याच्यावर हा फोन फेकून मारला तर त्यालाही जखम होईल पण नोकियाचे फोन काही तुटणार नाही अशा प्रकारचे विनोद अजूनही सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. अशातच मायक्रोसॉफ्टचे जनरल मॅनेजर पीटर स्किलमन यांनी बंदुकीची गोळी अडकेला नोकिया फोनचा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे आणि काही मिनिटांतच त्यांची पोस्टही अगदी वा-यासारखी सोशल मीडियावर पसरली आहे.
ट्विटरवर स्किलमन यांनी बंदुकीची गोळी अडकेला नोकिया फोनचा एक फोटो शेअर केला आहे. अफगाणिस्तानमध्ये असताना एकावर बंदुकीने गोळी झाडण्यात आली, खिशात असलेल्या नोकियाच्या मोबाईलमध्ये ही गोळी अडकली. ही गोळी फोनमधून आरपार न जाता फोनमध्येच अडकून पडल्याने एकाचे प्राण यामुळे वाचले असे ट्विट त्यांनी केले. आता नेमके कोणाचे प्राण यामुळे वाचले हे मात्र त्यांनी सांगितले नाही पण लगेचच त्यांचे हे ट्विट आणि फोनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
A Nokia phone I worked on a few years ago saved the life of a man in Afghanistan last week. The embedded bullet…. pic.twitter.com/O2zBxadkDO
— peter skillman (@peterskillman) October 5, 2016