५०० आणि १००० च्या नोटा चलानातून बाद करण्याच्या निर्णय मोदींनी जाहिर केल्यानंतर सामान्य माणसांपासून ते पैशावाल्यांची जी काही तारांबळ उडली की विचारायची सोय नाही. सुट्या पैशांचा अभाव त्यातून कोणीही या नोटा घेईना त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. कोणाला प्रवासात अडचणी येत होत्या, तर कोणाला रुग्णालयात उपचार घेताना अडचणींना समोरे जावे लागते होते. अशातच खाण्या-पिण्याची अबाळ होणे ही प्रत्येकांची सामूहिक समस्या होती. सुटे पैसे नसल्याने अनेक हॉटेल मालकांनी ग्राहकांना नकार दिला. पण एक हॉटेल मालक असाही होता ज्याने मात्र या सामूहिक समस्यांनी ग्रासलेल्या नागरिकांना औदार्य दाखवले. या हॉटेलचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अकोला जिल्ह्यातील खामगाव रस्त्यावर मराठा हॉटेल आहे. ज्यांच्याकडे १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी जेवणाची चिंता करू नये. निसंकोच मनाने जेवण करून घ्यावे आणि पुढच्या वेळी बिलाचे पैसे द्यावे अशा प्रकारचे बोर्ड या हॉटेलने लावले आहे. हॉटेलचा हा निर्णय कौतुकास्पद आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा झाली नाही तर नवलच ! केवळ जून्या नोटेमुळे कोणी उपाशी राहू नये हा साधा विचार या हॉटेलने केला त्यामुळे अनेकांची किमान जेवणाची समस्या तरी दूर झाली. मंगळवार मध्यरात्री पासून या नोटा चलनातून बाद झाल्याने मेट्रो, महावितरण, टोलनाके तसेच औषधविक्रेत्यांनी या नोटा स्वीकारण्यास नकार दिला होता. पण नंतर राज्यसरकारने आदेश दिल्यानंतर आजचा दिवस या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत.