गौतमी पाटील हा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहेत. गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमावरून अनेकदा वाद निर्माण झाला आहे. तसंच आजच लोककलावंत रघुवीर खेडकर यांनी भूमिका मांडली. लोककलेची गौतमी पाटील करू नका असं त्यांनी म्हटलं आहे. त्यापाठोपाठ आता गौतमी पाटीलच्या नाचाविषयी अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी भाष्य केलं आहे.
काय म्हटलं आहे प्रिया बेर्डे?
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाबाबत प्रिया बेर्डे म्हणाल्या, “या सगळ्या गोष्टींना बघणारे जबाबदार आहेत. अशा प्रकारची गाणी, तमाशा चवीने बघणारे लोक आहेत तोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाहीत. आम्ही कलाकारांनी किंवा राज्यकर्त्यांनी ओरडून कितीही निषेध केला तरी काही उपयोग होणार नाही. आम्ही काही बोललो की आम्हाला ट्रोल केलं जातं. पण म्हणून आम्ही बोलणं थांबवणार नाही. लोक जोपर्यंत असे कार्यक्रम पाहणं बंद करत नाहीत तोपर्यंत हे सुरुच राहणार” अशी भूमिका प्रिया बेर्डे यांनी मांडली आहे. सांगली या ठिकाणी प्रिया बेर्डे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना गौतमी पाटील यांच्या विषयी विचारलं असता त्यांनी हे मत मांडलं आहे.
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला आहे. नाशिक या ठिकाणी प्रिया बेर्डे यांनी भाजपात प्रवेश केला. प्रिया बेर्डे या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आहेत. तसंच त्यांनी अशीही बनवा-बनवी, अफलातून, चल धर पकड अशा सिनेमांमधून काम केलं आहे. तसंच हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे. एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून प्रिया बेर्डे ओळखल्या जातात. गौतमी पाटील हा विषय सध्या चर्चेत आला आहे. त्यावर प्रिया बेर्डेंना प्रश्न विचारला असता त्यांनी लोक बघणं थांबवत नाहीत तोपर्यंत हे कार्यक्रम सुरूच राहणार असं म्हटलं आहे.
रघुवीर खेडकर यांनी गौतमी पाटील बाबत काय म्हटलं आहे?
“मला हे सांगायचं आहे की बऱ्याच गावातले लोकं १०० कलावंत असणाऱ्या तमाशाला दोन लाख रूपये द्यायला कुंथतात, हात जोडतात, विनवण्या करतात. पण चार पोरी आणि पाचवी गौतमी पाटील तिला पाच-पाच लाख रूपये देतात. हे काय आहे? असं करू नका. लोककलेची ‘गौतमी पाटील’ करू नका. लोककला ही लोककलाच राहिली पाहिजे. तिचा तुम्ही ऱ्हास करू नका.”
तमाशातल्या कुठल्या पोरीने असे हातवारे केले आहेत? कधी केले होते? ५० ते ६० वर्षे मी तमाशा चालवतो आहे. आम्ही कधीही असे हातवारे करून नाच केला नाही. या पोरीने (गौतमी पाटील) हातवारे केले. तिला पाहायला एवढे उत्सुक असतात की मारामाऱ्या होतात. हे काय चाललंय? महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे? पुढाऱ्यांचं तर लक्ष नाही या गोष्टीकडे. यावर सगळ्यांनीच लक्ष ठेवलं पाहिजे. कुठली कला, कुठली कलावंत काय करते आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल.”