Marathi Bhasha Din 2024 : मराठी ही आपली मातृभाषा आहे. जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. अनेक दिग्गज साहित्यिक, कवी लेखक यांनी मराठी भाषेत उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती केली आहे. मराठी ही राजभाषा आणि ज्ञानभाषा व्हावी यासाठी केलेल्या संघर्षामध्ये नेहमीच अग्रेसर असलेली व्यक्ती म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. देश पातळीवर मराठीचा गौरव व्हावा यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाला आणि त्यांच्या दर्जेदार कलाकृतींना अभिवादन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. २०१३ मध्ये या निर्णयाची अधिकृत घोषणा झाली आणि तेव्हापासून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन उत्साहात साजरा केला जातो.
महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या मायबोली मराठीचा आपल्याला अभिमान वाटतो. पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करताना आपण आपलीच भाषा विसरत चाललो आहोत का, असा प्रश्न अनेकांना पडतो. मराठी बोलीभाषेमध्ये पाश्चात्त्य शब्दही सर्रास वापरले जातात. लिहितानाही अनेकदा मराठी भाषेतील शब्दांची मोडतोड केली जाते. त्यामुळे भाषेच्या संवर्धनाची गरज निर्माण होते. त्यासाठी रोजच्या वापरातील मराठी भाषा सुधारण्याची आवश्यकता आहे. आपल्या रोजच्या वापरातील शब्दही आपण अनेकदा चुकीच्या पद्धतीने लिहितो किंवा उच्चारतो. जर तुम्हाला तुमची मराठी भाषा सुधारायची असेल, तर तुम्ही मराठी भाषेत लिहिताना होणाऱ्या काही चुका टाळल्या पाहिजेत. मराठीत लिहिताना हमखास चुकणाऱ्या शब्दांची यादी येथे देत आहोत. ती शांतपणे एकदा नक्की वाचा, समजून घ्या आणि पुन्हा हे शब्द वापरताना आपल्याकडून होणाऱ्या चुका सुधारून, योग्य तेच शब्द वापरा. चला तर मग जाणून घेऊ ते शब्द…
हेही वाचा – Marathi Bhasha Din: पाकिस्तानातील ‘या’ शाळेला आहे मराठी माणसाचे नाव; वाचा, काय आहे कारण…
मराठी भाषेत लेखन करताना हमखास चुकणारे शब्द!
चुकणारे शब्द – बरोबर शब्द
स्त्रि – स्त्री – स्त्रियांना (अनेकवचन)
तथापी – तथापि
परंतू – परंतु
आर्शिवाद, आशिर्वाद – आशीर्वाद
दिपावली – दीपावली
हार्दीक – हार्दिक
मैत्रिण – मैत्रीण (एकवचन), मैत्रिणी (अनेकवचन)
जाणिव – जाणीव (एकवचन), जाणिवा (अनेकवचन)
उणिव – उणीव (एकवचन) उणिवा(अनेकवचन)
पारंपारीक, पारंपारिक – पारंपरिक
तिर्थप्रसाद – तीर्थप्रसाद
शिबीर – शिबिर
शिर्षक – शीर्षक
मंदीर – मंदिर
कंदिल – कंदील
स्विकार – स्वीकार
दिड – दीड
परिक्षा – परीक्षा
सुरवात – सुरुवात
सुचना – सूचना
कुटूंब – कुटुंब
मध्यंतर – मध्यांतर
कोट्याधिश – कोट्यधीश
विद्यापिठ – विद्यापीठ
विशिष्ठ – विशिष्ट
अंध:कार – अंधकार
अंधःश्रद्ध – अंधश्रद्धा
आगतिक – अगतिक
मतितार्थ – मथितार्थ
अणीबाणी – आणीबाणी
अल्पोपहार – अल्पोपाहार
कोट्यावधी – कोट्यवधी
तत्व – तत्त्व –
महत्व – महत्त्व
व्यक्तिमत्व – व्यक्तिमत्त्व
उध्वस्त – उद्ध्वस्त
चातुर्मास- चतुर्मास
निघृण- निर्घृण
मनस्थिती- मनःस्थिती
पुनर्स्थापना- पुनःस्थापना
मनःस्ताप – मनस्ताप
तात्काळ – तत्काळ
सहाय्य, सहाय्यक – साह्य, सहायक
शुभाशिर्वाद – शुभाशीर्वाद
तज्ञ – तज्ज्ञ
सर्वोत्कृष्ठ – सर्वोत्कृष्ट
अल्पसंख्यांक, बहुसंख्यांक – अल्पसंख्याक, बहुसंख्याक
औद्योगीकरण, भगवेकरण- उद्योगीकरण, औद्योगिकीकरण, भगवीकरण
महाराष्ट्रीयन – महाराष्ट्रीय
सृजन, सृजनशील, सृजनशीलता – सर्जन, सर्जनशील, सर्जनशीलता
शिर – शीर (डोके)
शिर – शीर (रक्तवाहिनी)
उपाहार – उपहार (भेट)
उपहार – उपाहार (नाश्ता)
अट्टाहास – अट्टहास
अविष्कार – आविष्कार
आनुवंश, अनुवंशिक – अनुवंश, आनुवंशिक
क्रिडा – क्रीडा
सांप्रदाय, संप्रदायिक – संप्रदाय, सांप्रदायिक
सूज्ञ – सुज्ञ
धिःकार – धिक्कार
सोज्वळ – सोज्ज्वळ
केंद्रिय – केंद्रीय
केंद्रीत- केंद्रित
नाविन्य – नावीन्य
पाश्चात्य – पाश्चात्त्य
पाश्चिमात्त्य – पाश्चिमात्य
पितांबर – पीतांबर
निर्भत्सना – निर्भर्त्सना