60th Marriage Anniversary Wedding Video: जगात प्रत्येक नातं हे विभागलेलं असतं, आपले आई- बाबा झाले तरी, भावंडांचाही त्यांच्यावर हक्क असतो. आपले मित्र हे फक्त आपलेच मित्र नसतात, आपली मुलं सुद्धा फक्त आपली अशी नसतात. आजी, मावशी, आत्या, काकू, सासू- सासरे, सगळीच नाती फक्त आपली आहेत असं कधीच म्हणता येत नाही. एवढंच कशाला, आपण स्वतःवरही कित्येकदा पूर्ण हक्क गाजवू शकत नाही. पण एकच असं नातं आहे ज्याचा आपल्याकडे पूर्ण अधिकार असतो ते म्हणजे नवरा आणि बायकोचं. “जगात फक्त हा फक्त माझाच नवरा आहे”, आणि “ही फक्त माझीच बायको आहे”, असं हक्काने म्हणता येतं. अर्थात त्यात अपवाद आहेतच, पण गमतीचा भाग सोडला तर निवडून जोडलेलं आणि नेटाने निभावलेलं असं हे नातं जपलं तर आयुष्यात सगळ्या गोष्टींची कमतरता भरून काढू शकतं. दुर्दैवाने अलीकडे अशी हळुवार जपून ठेवलेली नाती फार कमी झाली आहेत. असं असलं तरी ‘नातं सांभाळणं’ अशक्य नाही हे दाखवणारा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. एका आजी- आजोबांचं लग्न पाहून नेटकऱ्यांच्या सुद्धा डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत व चेहऱ्यावर हसू उमटलं आहे.
प्रजोत गावकर आणि सृजिती कटारे या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या एका रीलमध्ये एका आजी- आजोबांच्या लग्नाचा ६० वा वाढदिवस हटके पद्धतीने साजरा केल्याचे दिसतेय. हौशी कुटुंबाने या दोघांचं पुन्हा एकदा लग्न लावून दिलं आहे. आयुष्याची ६० वर्षे एकत्र घालवूनही नव्या जोडप्यासारखा उत्साह व आनंद या आजी- आजोबांच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि तोच मुळात पाहणाऱ्यांनाही भावतोय. व्हीलचेअरवर बसलेल्या नवरीबाईंना छान मेकअप करून सजवलेलं दिसतंय तर आजोबा सुद्धा ऐटीत टोपी आणि मुंडावळ्या बांधून अंतरपाटाच्या पलीकडे आपल्या सहचारिणीची वाट पाहत उभे आहेत. आजोबांनी अंतरपाट सरण्याआधी हात जोडून, डोळे मिटून केलेली प्रार्थना चटकन डोळ्यात पाणी आणते. कदाचित आयुष्याच्या या टप्यावर एका सुंदर जोडीदाराबरोबरच इतकं प्रेम देणारं कुटुंब मिळाल्यासाठी हे आजोबा देवाचे आभार मानत असतील असे अंदाज नेटकऱ्यांनी बांधले आहेत. तुम्ही सुद्धा हा सुंदर व्हिडीओ पाहाच..
Video: आयुष्याच्या या टप्यात अजून काय हवं असतं?
हे ही वाचा<< “कोणत्या गालावर मारलं..”, पत्रकाराने कंगना रणौत यांना लोकांमध्ये विचारला प्रश्न? Video चा हा अँगल चुकवू नका, Video
तब्बल ३२ हजाराहून जास्त लाईक्स व कमेंट्स असलेल्या या व्हिडीओने जवळपास प्रत्येक वयोगटातील व्यक्तीच्या मनाला स्पर्श केला आहे. तरुणांनी यावर कमेंट करताना, “आयुष्यात अशी साथ देणारा जोडीदार हवा”अशी आशा व्यक्त केली आहे तर हा अनुभव अगोदरच घेतलेल्या मंडळींनी, “आपल्याला इतकं प्रेम देणारं कुटुंब असावं” अशी इच्छा व्यक्त केली आहे. बाबांनी केलेली प्रार्थना मनाला लागली आणि समजलीही त्यांनी नक्कीच आपल्या परिवाराच्या सुखासाठी प्रार्थना केली असेल असेही नेटकरी कमेंट्स मध्ये म्हणत आहेत. तुम्हाला या व्हिडीओमधील कोणता क्षण सर्वाधिक भावला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.