२७ जुलै रोजी भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी होती. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना देशाचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखलं जायचं. लोकांचे राष्ट्रपती अशी ओळख असणारे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे झाला. २७ जुलै २०१५ रोजी आयआयएम- शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम यांचे निधन झाले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोशल नेटवर्किंगवरुन अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र त्यातही मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकरने कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त पोस्ट केलेला एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा हे फोटो >> चप्पल शिवणाऱ्याचा पाहुणचार ते नातेवाईंकासाठी नाकारलेली तिकीटं; असे होते कलाम सर…

अक्षयने कलाम यांची स्वाक्षरी असलेल्या ४ हजार ८५० रुपयांच्या एका बँक चेकचा फोटो मंगळवारी कलामांच्या पुण्यतिथीनिमित्त पोस्ट केलेला. या चेकमागील कथाही त्यांनी पोस्टमध्ये सांगितलेली. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “एकदा अब्दुल कलामांना एरोडे येथे एका कार्यक्रमात बोलावलं होतं. तिथे त्यांना भेट म्हणुन प्रायोजकाने त्यांच्या कंपनीचा मिक्सर देऊ केला. तो घेण्यास कलामांनी नकार दिला मात्र त्यांच्या कुटुंबाकरीता त्यांना मिक्सर हवा होता. त्यामुळे त्यांनी त्या मिक्सरच्या किंमतीएवढा ४ हजार ८५० रुपयांचा धनादेश प्रायोजकांना देऊ केला अन् तो मिक्सर विकत घेतला. पण त्या प्रायोजक कंपनीने एक महिना झाला तरी तो धनादेश बँकेत जमा न करता तसाच ठेवला. एक महिना झाला तरी धनादेश वटला नाही हे पाहून कलामांच्या कार्यालयातून त्या कंपनीला फोनकरून धनादेश न वटल्याबद्दल चौकशी केली गेली. त्या प्रायोजक कंपनीने देखील धनादेश जमा करणार नसल्याचे सांगून टाकले. त्यावर धनादेश जमा करणार नसाल तर तो मिक्सर कंपनीच्या पत्त्यावर परत पाठवून देऊ असे कलामांनी कंपनीला सांगितल., त्यावर त्या कंपनीने तो धनादेश बँकेत जमा करण्याची तयारी केली, तत्पूर्वी त्या धनादेशाचे एक प्रत छायांकित करून त्यांनी संग्रही ठेवली,”

पुढे अक्षय लिहितो, “दुसऱ्याच दिवशी धनादेश बँकेत जमा होऊन तो वटवला गेल्याचे काळातच कलामांच्या कार्यालयातून पुनःश्च आभार मानणारा दूरध्वनी गेला. ही घटना ऑगस्ट २०१४ मधील असून त्या कंपनीचे नाव सौभाग्या ग्राइंडर्स असे आहे. सोबत त्या धनादेशाचे प्रत जोडत आहे.”

ही पोस्ट अक्षयने शेअर केली असती तरी ती आपण लिहिलेली नाही हे त्याने पोस्टमध्ये सुचित केलं आहे. पोस्टच्या शेवटी त्याने लेखकाचं नाव म्हणून देवा झिंजाड या व्यक्तीचं नाव लिहिलं असून #सलाम_कलाम असा हॅशटॅगही वापरलाय.