Gujarati insult Marathi family in Ghatkoper: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, हल्ली ही प्रकरणं वाढत आहेत. अशातच घाटकोपरमधून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. जिथं नॉनव्हेज खाण्याच्या मुद्द्यावरून मराठी कुटुंबाला हिणवलं गेल्याचं आणि अपमानास्पद वागणूक दिली गेल्याचं कळतात मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचत तेथील अमराठी रहिवाशांना मनसे स्टाईलनं समज दिल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत सातत्याने मराठी विरुद्ध अमराठी हा वाद सातत्याने रंगताना दिसत आहे. असाच एक प्रकार मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात घडला. येथील एका गुजराती, मारवाडी आणि जैनबहुल सोसासटीत मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. शाह नावाच्या एका व्यक्तीने मांसाहार करण्यावरुन संबंधित कुटुंबाला, ‘मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो’, असे म्हटले.
या सोसायटीत बहुतांश कुटुंब ही जैन, मारवाडी आणि गुजराती आहेत. तर केवळ चार मराठी कुटुंब आहेत. गेल्या काही दिवसांपासून मांसाहार खाण्याच्या मुद्द्यावरुन या मराठी कुटुंबांना जैन आणि गुजराती बांधव त्रास देत आहेत. शाह नावाच्या व्यक्तीने याच कारणावरुन एका मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक दिली. हा प्रकार समजल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या सोसायटीत घुसले. मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी सोसायटीत शिरत संबंधित गुजराती आणि जैन कुटुंबीयांना या सगळ्याचा जाब विचारला. तेव्हा शाह नावाची व्यक्ती समोर आलीच नाही. तर सोसायटीतील इतर रहिवाशी आम्ही मराठी विरुद्ध अमराठी भेदभाव करत नाही, आम्ही मांसाहार खाण्यावर कोणतेही बंधन आणत नाही, अशी सारवासारव करताना दिसले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा यामध्ये कुणाची चूक आहे.
पाहा व्हिडीओ
मनसेनं दिली ताकीद
‘तुमचा जो कोण शाह आहे त्याला तुमच्या भाषेत समजवा. गुजरातीत, मारवाडीत, कोणती भाषा येते त्या भाषेत समजवा. जर मराठी माणूस चुकतोय तर त्याची चूक दाखवा. पण ,दोनचार मराठी कुटुंब असतील आणि त्यांच्यावर तुम्ही दादागिरी करत असाल तर, तुमच्याकडे पैसा सगळं आहे पण ही चार जणं आहेत ना त्यांच्यासाठी इथे ४ हजार येतील. तुम्ही जो शब्द वापरला, मराठी लोग गंदे है मग गंदे है तो महाराष्ट्र भी गंदा हो गया मग इधर क्यू आये आप?, इथं मिसळूनच राहावं लागेल’, असं ठणकावून सांगत मनसेनं मराठी कुटुंबांची बाजू उचलून धरली.