Marathi Bhasha Diwas 2024 : मुंबईतील रस्त्यांवरून प्रवास करताना सिग्नल यंत्रणेवर दिसणारे आकडे आतापर्यंत तुम्ही इंग्रजीत असल्याचे पाहिले असतील, पण याच मुंबईतील एका सिग्नल यंत्रणेवर आज चक्क मराठी आकडे पडत असल्याचे पाहायला मिळाले असून ज्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ज्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
मुंबईतील रस्त्यावरील सिग्नल यंत्रणेवर झळकणारे मराठी आकडे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं खरं, पण ते दिसण्यामागे आज कारणही तसे खास आहे. आज राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने राज्यभरात स्तुत्य उपक्रम राबवले जात आहेत. खास मराठी भाषेसाठीच्या उपक्रमांचा भाग म्हणून मुंबई रस्ते वाहतूक विभागाकडून यंत्रणेवर मराठी आकडे दाखवण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करणारे आज याच मराठी आकड्यांना फॉलो करून सिग्नलचे नियम पाळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ मुंबईतील कांदिवली पश्चिमतील शंकर गल्ली भागातील आहे. हा उपक्रम खऱ्या अर्थाने मराठी भाषेचा गौरव करणारा आहे असे म्हणावे लागेल.
मराठीसाठी झटणाऱ्या वि.वा.शिरवाडकरांनी ‘कुसुमाग्रज’ हे टोपणनाव का स्वीकारले?
मुंबईतील हा व्हिडीओ @Posterboychetanand या इन्स्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, मुंबई रस्ते वाहतूक विभागाकडून सिग्नल यंत्रणेमध्ये मराठी अंकांच्या उपयोगाचा स्तुत्य उपक्रम राबवला जाणे म्हणजे मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईकर आणि महाराष्ट्राला सप्रेम शुभेच्छाच म्हणायला हवे. दरम्यान, अनेकांना व्हिडीओतील हा उपक्रम फार आवडला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या या उपक्रमाचे आता कौतुक होत आहे. या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी संपूर्ण महाराष्ट्रातील सिग्नल यंत्रणेवर असं केलं पाहिजे अशी मागणी केली आहे; तर काहींनी मुंबईतील रेल्वेस्थानकावरसु्द्धा हिंदीमधून होणारी उदघोषणा बंद करून फक्त मराठी आणि इंग्रजीतून केली जावी, अशी मागणी केलीय.