आजच्या काळात नोकरी करणे ही एखाद्याची आवड नसून गरज झालेली आहे. वाढत्या महागाईमुळे एका व्यक्तीच्या पगारात घर चालवणं सर्व सामान्यांसाठी अशक्यच झालेलं आहे. त्यामुळे नवरा-बायको दोघांनाही नोकरी करणे भाग आहे. आजच्या काळात फक्त पुरुषच नव्हे तर आता महिलाही आता नोकरी करत आहे. सुशिक्षितांकडे नोकरीचा पर्याय कायम असतो पण अशिक्षित लोकांना हा पर्याय नसतो. पण नोकरी मिळो न मिळो, कोणतेही कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणीही आपल्या संसारांला हातभार लावू शकतो हे पार्वती काकूंनी दाखवून दिले आहे. कोणतेही काम करून चार पैसे कमावावे आणि आपल्या संसाराला हातभार लावावा असा प्रेरणादायी विचार करणाऱ्या या काकू सध्या चर्चेत आहेत. सध्या सोशल मीडियावर पाणीपुरी विकणाऱ्या पार्वती काकूंचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या काकूंचे विचार ऐकून तर नेटकरी थक्क झाले असून त्यांचे कौतूक करत आहे.
पाणीपुरी विक्रेत्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका पाणीपुरी विक्रेत्या महिलेचा आहे जो sandeshdanielvlogs नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर संदेश डॅनिअल नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये हा व्यक्ती आजकालच्या माहिलांना काय सांगाल असे विचारतो त्यावर उत्तर देताना काकू म्हणतात की ”प्रंपच म्हटलं की, दोन चाक आहे नवऱ्या बायकोची. ही एक गाडी हाय दोघांनी पण ओढलं तर प्रंपच पुढे जातो. ‘नवऱ्याच्या जीवावर बसून चालत नाही…आम्ही हाय अडाणी…शिकलेले लोक नोकरी करतात. आम्ही काय करायचं ….म्हणून हे काम करतो. नवऱ्याला आधार दिला त प्रपंच पुढे सरतयं. बायकांनी पण राबावं, कष्ट केल्याशिवाय पचत नाही. कष्ट करत राहावं.”
काकूंच्या विचारांनी महिलांनी दिली प्रेरणा
काकूंचे हे विचार ऐकूण अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. आजच्या काळात महिलांनी स्वावलंबी का असलं पाहिजे, कष्ट करून चार पैसे का कमावले पाहिजे हे एका अशिक्षित महिलेला देखील समजते पाहून लोकांना त्यांचे फार कौतूक वाटत आहे. कित्येकांनी कांकूचे भरभरून कौतूक केले आहे. काकूंचे विचार ऐकून कित्येकांनी ‘काकू तुम्ही अडाणी नाही’असे म्हटले आहे तर काहींनी, ”तुमचे विचार ऐकून सुशिक्षितांनाही लाज वाटेल” असे सांगितले आहे.
नेटकऱ्यांनी काकूंचे केलं भरभरून कौतूक
एकाने व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली केली की, ”अडाणी जे असतात ज्यांचे विचार खराब असतात…..मावशी तुमचे विचार तर सुशिक्षित अडाणी लोकांना पण लाजवेल… अश्या विचारांमुळेच हे स्वराज्य आज पण थोर विचारवंतांचा महाराष्ट्र म्हणून ओळख आहे.” तर दुसऱ्याने लिहिले की, ”अप्रतिम, तुम्ही अडाणी नाहीत काकू…..” तर तिसऱ्याने कमेंट केली, ”आई तुम्ही अडाणी नाहीत…. तुम्ही शिकलेल्या लोकांसाठी तुम्ही उदाहरण आहात. आज काही लोक शिकून ही काही करत नाहीत…”
हेही वाचा – ‘आम्हाला का लाज वाटली पाहिजे?…. दिल्ली मेट्रोत कपलच्या ‘या’ कृत्यावर भडकली काकू, भांडणाचा Video व्हायरल!
ज्या महिला घर सांभळतात त्यांच्या कष्टांची तुलना करणे अशक्य आहेय. काहींनी काकूंच्या स्वावलंबी आणि कष्ट करण्याच्या विचारांचा मान ठेवत ज्या महिला घर सांभळतात त्यांच्या कष्टाचे कौतूक केले. एकाने म्हटले की, ”ज्या महिला घर चालवतात त्या सुद्धा कोणतीच अपेक्षा न ठेवता खूप राबत असतात आपल्या संसारासाठी बाकी या काकींसारख्या सर्वच महिलांना मानाचा मुजरा”
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? काकूंचा विचारांवर तुमचे मत काय आहे…आम्हाला नक्की कळवा