क्रिकेटची क्रेझ जजसशी वाढली. तसे मातीतले खेळ लुप्त झाले. त्यातलाच एक खेळ म्हणजे मल्लखांब. चपळ शरीरयष्टी, अचूक टायमिंग, कमालीची लवचिकता आणि एका लाकडी खांबावर तोल सावरत डोळ्याचे पाते लवेपर्यंत केलेल्या हालचाली पाहाताक्षणी कोणीही या खेळाच्या प्रेमात पडावे असा हा खेळ. मात्र या मातीतल्या खेळाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याची माती झाली. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यातील एका  छोट्याशा गावाने या खेळातील चपळपणा, लवचिकता आणि त्यातील थरार आजही जपलाय. मुलांसोबत मुलीदेखील चपळतेन हा खेळ खेळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडी हे ते गाव. १९९९ साली गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गोकुळ गोरे जॉईन झाले. मल्लखांबाची आवड असलेल्या गोरे सरांनी वर्षभरात मल्लखांबाचा पोल रोवला आणि प्रशिक्षणाला सुरुवात केली. सुरुवातीला मोजके विध्यार्थी असलेला हा वर्ग गेल्या १७ वर्षात वाढत गेला. रोप, रस्सी, पूल असे वेगवेगळे प्रकार वाढत गेले. तशी विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. लांबून पाहणारी मुले खेळात सहभागी झाली. एका पायावर उभे राहणे. पाय मानेवर टाकत हाताच्या तळव्यावर संपूर्ण शरीराचा तोल सावरण. एकट्याने, सांघिक असे वेगवेगळे सहासी प्रकार खेळले गेले. गावात साहसी खेळ करणाऱ्या मुलांना तो खेळ भावला. पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून आतापर्यंत १५० पेक्षा अधिक खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रतिनिधित्त्व केले आहे. मल्लखांब खेळाला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंची संध्या सर्वाधिक आहे. माघील १७ वर्षापासून गोरे सर नवनवीन नियमासह मल्लखांबचे धडे देत आहेत. एका पाठोपाठ दुसरी पिढी तेवढयाच आवडीने त्यात सहभागी होताना दिसते. हे चक्र अविरतपणे सुरु आहे.

गोरे सरांच्या तालमीत तयार झालेले अनेक विध्यार्थी राष्ट्रीय स्तरावरही खेळले आहेत. सचिन पाटील हा विध्यार्थी राष्ट्रीय स्तरावर खेळला. गोरे सरांचा मुलगाही मल्लखांबपट्टू आहे. अक्षयने बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून चंदिगड इथे पार पडलेल्या स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचाच विद्यार्थी असलेल्या अभिजित मडके या मल्लखांबपट्टूने सोलापूर विद्यापीठाकडून चंदिगडचे मैदान गाजवले आहे. मुलांसोबत मुलीही मल्लखांबाचे धडे घेत आहेत. नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सायली माने या विद्यार्थीनींने राज्यस्तरीय स्पर्धेत खेळली आहे. तिला दहावीमध्ये ९६.४० टक्के गुण मिळाले असून त्यात खेळाचे गुण समाविष्ठ आहेत.
मल्लखांब हा खेळ साहसी खेळ प्रकारातील आहे. जागतिक स्तरावर हा खेळ पोहोचला असून, मल्लखांबचे खेळाडू मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे पुढे जाताना दिसत नाहीत. अन्य खेळांप्रमाणे मल्लखांबच्या खेळाडूला शिक्षण, नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण मिळावे. मल्लखांबच्या स्पर्धा वेगवेगळ्या स्तरावर मोठ्याप्रमाणात आयोजित करण्यात याव्यात. त्याचबरोबर खेळाडूंना स्पर्धेसाठी काही रक्कम क्रीडा विभागाकडून मिळाल्यास ग्रामीण भागातील खेळाडू नाव कमावतील, असे मत क्रीडा शिक्षक असलेल्या गोकुळ गोरे यांनी व्यक्त केले.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi special article on mallakhamb khamaswadi village save this game osmanabad distict