आज जगभरात ईद साजरी केली जात आहे. देशभरातून मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ईदच्या आदल्या दिवशी मुस्लिम निर्वासितांसोबत इफ्तारचा आनंद घेतानाचा फोटो मार्कने फेसबुकवर शेअर केला.

‘मी पहिल्यांदाच सोमालियन निर्वासितांसोबत इफ्तारचा आनंद घेत आहे, त्यांच्यासोबत रमझानच्या पवित्र महिन्यांचा शेवट इतका आनंदात होईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं,’ असं त्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. पण त्याचबरोबर निर्वासितांचा तिरस्कार करणाऱ्यांसाठी त्याने एक उदाहरणही आपल्या पोस्टमध्ये लिहिले. ‘इफ्तारच्या मेजवानीत मी एका व्यक्तीला भेटलो. ज्याने २६ वर्षे निर्वासितांच्या छावणीत घालवली होती. तुला अमेरिकेत आपल्या घरासारखं वाटतं का?, असं मी त्या व्यक्तीला विचारलं. त्यावर त्या व्यक्तीने विचार करायला लावणारं उत्तर दिलं. घर ते असतं जिथे तुम्हाला हवं ते करण्याचं आणि हवं तसं वागण्याचं स्वातंत्र्य असतं, असं उत्तर त्या निर्वासितानं दिलं. तो निर्वासित होता खरा पण त्याला अमेरिका आपल्या घरासारखीचं वाटत होती, कारण अमेरिका प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आदर करते.’ मार्कची ही पोस्ट निर्वासितांचा तिरस्कार करणाऱ्या प्रत्येकाला विचार करायला लावणारी होती. एकाअर्थी ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टोला लगावणारीच होती, असं अनेकांचं म्हणणं होतं.

VIDEO: ‘महिला सिंघम’ने भाजपच्या ‘नेताजीं’ना दाखवला पोलिसी खाक्या

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत येणाऱ्या निर्वासितांवर तात्पुरती बंदी घातली. आपल्या अध्यक्षपदाच्या पहिल्या १० दिवसांमध्येच त्यांनी या अध्यक्षीय आदेशावर सही केली. यामध्ये सोमालियातून येणाऱ्या मुस्लिम निर्वासितांचा देखील समावेश होता. तेव्हा मार्कने ट्रम्प यांच्या निर्णयावर खुलेपणाने टीका केली होती. अमेरिकेत असलेले आपण सर्वजण जगातल्या निरनिराळ्या भागातून आलेले स्थलांतरित आहोत. अमेरिकेतली अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची आहेच. पण काही स्थलांतरितांना ते फक्त एक विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून इथे प्रवेश न देणं चुकीचं आहे. ज्याला जी मदत हवी त्याला ती मिळाली पाहिजे’ अशा शब्दात झकरबर्गने टीका केली होती. आता सोमालियन निर्वासितांसोबत इफ्तार मेजवानीचा फोटो शेअर करून त्याने आपण या निर्वासितांच्या बाजूने आहोत हे दाखवून दिले आहे.

वाचा : फेसबुकवर प्रोफाईल पिक्चरची चोरी रोखण्यासाठी ‘हे’ करा