बिहारमधील एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीचे कुटुंबीय तिला तिच्या सासरच्या घरातून बळजबरी बाईकवरून घेऊन जाताना दिसत आहे. तर हे प्रकरण प्रेमविवाहाशी सबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर मुलीच्या सासरच्यां लोकांनी तिच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मुलीच्या घरचे तिने मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे नाराज होते. त्यामुळे त्यांनी अचानक मुलीच्या सासरच्या घरी जाऊन मुलीला बाईकवरुन बळजबरी उचलून आणलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन तरुण मुलीला बाईकवर बळजबरी लटकवून घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावेळी ती मुलगी जोरजोरात ओरडत आणि रडत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तर यावेळी गावातील अनेक लोक ही घटना पाहात उभे असल्याचं दिसत आहे.
पीडित मुलीच्या सासरच्या लोकांनी ऑनर किलिंग अंतर्गत मुलासह सूनेची हत्या करण्याची भीती व्यक्त करत गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे, फारबिसगंज एसडीपीओ खुशरू सिराज आणि पोलीस कर्मचारी नंदकिशोर नंदन यांनी तातडीने कारवाई करत मुलीला ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे याआधीही मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या वडिलांना मारहाण केली होती. ज्यामध्ये मुलाच्या वडिलांचा एक हात तुटला होता. त्यावेळीही मुलीच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या घटनेचा व्हिडीओ @kumarprakash4u नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये “फिल्मी स्टाईल…फुल एक्शन! बिहारमधील अररिया येथील व्हिडिओ पाहा. आंतरजातीय विवाह मुलीच्या घरच्यांना पटला नाही, त्यामुळे लग्नानंतर तिला बाईकवरुन उचलून पळवून नेलं. पोलिसांनी कारवाई केली आणि मुलीला ताब्यात घेतले.” या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, आधी ओमनी मधून पळवून न्यायचे आता बाईकवरुन नेतात, तर आर्मी किंग नावाच्या युरजने “बिहार हे नाव पुरेसे आहे, स्पष्टीकरण देण्याची गरज नाही.” अशी कमेंट केली आहे.