युकेच्या साउथॅम्प्टनमधील रेल्वे स्टेशनजवळ आग लागल्यानंतर भीषण स्फोट झाले. आगीची भीषणता पाहून स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. स्फोटाचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामुळे काहीतरी मोठी घटना घडल्याची भीती स्थानिक नागरिकांना वाटत होती. तसेच सोशल मीडियावर अफवांना पेव फुटलं होतं. काही नागरिकांना रेल्वे स्टेशनजवळ बॉम्बस्फोट झाल्यासारखं वाटत होतं. तर आगीचे लोट पाहिल्यानंतर काही जणांना फटाके फुटत असल्याचं वाटलं. मात्र खरं कारण कळल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेमुळे रेल्वेचं वेळापत्रकही कोडमडलं.
बीबीसीने वृत्त दिले की, सोमवारी तरुणांच्या एका गटाने एक स्कूटर ट्रॅकवर फेकल्यानंतर आग लागली. ब्रिटीश ट्रान्सपोर्ट पोलिस आणि अग्निशमन दल माहिती मिळाल्यानंतर रात्री ८ वाजता घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. घटनास्थळावरून स्कूटर जप्त करण्यात आली आहे. मात्र शोध घेऊनही गुन्हेगार तरुण सापडले नाहीत. दुसरीकडे आगीचे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्काच बसला. “आगीची दृश्य पाहून काही क्षण माझ्या हृदयाचे ठोके थांबले! आश्चर्य वाटले की हे कशामुळे झाले असेल,” अशी कमेंट्स एका युजर्सने दिली आहे.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे. स्कूटर रेल्वे ट्रॅकवर फेकण्यामागचं कारण काय? याबाबत तपास केला जात आहे. लवकरच या घटनेचा तपास पूर्ण होईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.